मिळकतकर अभय याेजना राबवा ; नगरसेवकांची मागणी

पुणे : ऑगस्ट महिन्याअखेर सुमारे पावणे सात हजार काेटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी शास्तीच्या रक्कमेसह असुन, मिळकत कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी अभय याेजना राबवावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत दाखल केला गेला आहे.

महापालिकेने यापूर्वी दाेन वेळा अभय याेजना राबविली आहे. मिळकत कर वेळेत न भरणाऱ्यांकडून दाेन टक्के शास्ती वसुल केली जात आहे. मिळकत करावर दरमहा दाेन टक्के शास्ती आकारली जात असल्याने, थकबाकीची रक्कम माेठ्या प्रमाणावर दिसत आहे. शहरातील पाच लाख ३४ हजार४१० मिळकतदारांकडे सुमारे २ हजार ११७ काेटी रुपये इतकी थकबाकी आहे. त्यावरील शास्तीची रक्कम २ हजार ४६८ काेटी रुपये इतकी थकबाकी आहे. माेबाईल टाॅवर कंपन्यांकडे सुमारे ५३१ काेटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यावर लावण्यात अालेल्या शास्तीची रक्कम सुमारे ६२१ काेटी ९४ लाख रुपये इतकी आहे. एकूण ५ हजार ७३९ काेटी रुपये इतकी थकबाकी आहे. एकुण या थकीत आकडेवारीचा विचार करता, मूळ मिळकत कराच्या व्यतिरीक्त शास्तीची रक्कम ही अधिक शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. शास्तीची रक्कम ही चक्रवाढ पद्धतीने वाढत असून, मूळ मागणीपेक्षा व्याजाची रक्कम अधिक आहे. अभय याेजना राबवून शास्तीची रक्कम कमी करून मिळकतदारांकडून अधिक कर वसुल करता येऊ शकताे असा प्रस्ताव नगरसेवकांनी स्थायी समितीला सादर केला आहे.