पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा- अजित पवार

    पुणे: पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विधानभवन येथील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्याचा संपूर्ण प्रारुप आराखड्याबाबत बैठक झाली.
    पाण्याची गरज असलेल्या प्रत्येक गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
    पाण्याची गरज लक्षात घेत गावनिहाय नियोजन होणे आवश्यक आहे. गावातील पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थीत पाहीजे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ उपस्थित होते.