दीड दिवसांत धरणात आले तीन टिएमसी पाणी

धरणक्षेत्रातील जाेरदार पावसामुळे झाला फायदा

पुणे : मंगळवारपासून धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणी साठ्यात तीन टिएमसीने वाढ झाली आहे. हा पाणीसाठा १३टिएमसीपर्यंत पाेचला आहे. शहरांत मध्यरात्री पडलेल्या जाेरदार पावसानंतर बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती.

जुलै महीन्यात पावसाने ओढ  दिल्याने चिंता निर्माण झाली हाेती, ती काही प्रमाणात दाेन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे कमी झाली आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगांव या चार धरणातील पाण्याचा वापर हा पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रामुख्याने जास्त हाेताे. तसेच या धरणातुन शेतीसाठीही पाणी पुरवठा केला जाताे. या चारही धरणांतील एकुण पाणीसाठा क्षमता २९ टिएमसी इतकी आहे. बुधवारी सांयकाळपर्यंत या धरणातील एकुण पाणीसाठा १२.९९ टिएमसी इतका झाला आहे.

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी सहा पर्यंत या चारही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. खडकवासला धरण क्षेत्रात ६८ मिलीमीटर, पानशेत ( १७७ मिलीमीटर), वरसगांव ( १६५ मिलीमीटर ) आणि  टेमघर धरण क्षेत्रात १७० मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात माेठी वाढ झाली. बुधवारी सकाळी सहा ते सांयकाळी सहा पर्यंत या धरणक्षेत्रातील पावसाचा जाेर कमी झाला असला तरी खडकवासला ( १२ मिलीमीटर ), पानशेत ( ५४ मिलीमीटर ), वरसगांव ( ५५ मिलीमीटर ) आणि  टेमघर धरण क्षेत्रात ४० मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. खडकवासला धरण ६१ टक्के, पानशेत धरण ५१ टक्के, वरसगांव धरण ५५ टक्के आणि  टेमघर धरण सुमारे २६टक्के इतके भरले आहे.