अनोख्या पद्धतीने : विनवणी वीज बिल भरण्यासाठी महावितरणाचे विभागाचे संगीतातून साकडं

राज्यभर पुन्हा वीज तोडणी सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाने संगीतातून साकडं घालायला सुरुवात केलीये. ग्राहकांनी वीज बिल का भरावं, याबाबत त्यांच्यात जनजागृती केली जातीये. शहरातील चौकाचौकात ही मोहीम राबवली जात आहे. कर्मचारी स्वतः वेगवेगळी गीत गाऊन सर्वांचं लक्ष वेधत आहेत.

    मुंबई: वीज बिल भरण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाकडून मात्र ग्राहकांना एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विनवणी केली जातीये. चौकाचौकात उभं राहून कर्मचारी संगीत गातायेत आणि मग थकीत वीज बिल भरा अशी विनवणी ते या माध्यमातून करतायेत. ही मोहीम नागरिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरतेय.

    राज्यभर पुन्हा वीज तोडणी सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाने संगीतातून साकडं घालायला सुरुवात केलीये. ग्राहकांनी वीज बिल का भरावं, याबाबत त्यांच्यात जनजागृती केली जातीये. शहरातील चौकाचौकात ही मोहीम राबवली जात आहे. कर्मचारी स्वतः वेगवेगळी गीत गाऊन सर्वांचं लक्ष वेधत आहेत. थकीत बिलं भरण्यासाठी शहरात वेगवेगळ्या पध्दतीने जनजागृती केली जातीये, त्याचाच हा एक भाग आहे. म्हणूनच महावितरण विभागाच्या या आगळ्या-वेगळ्या मोहिमेची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे. आता या चर्चेचं रूपांतर बिल अदा करण्यात झालं तर खऱ्या अर्थाने ही मोहीम सार्थकी लागली असं म्हणता येईल.

    कोरोनाचा शिरकाव झाला आणि देश लॉकडाऊन झाला. कंपन्या बंद झाल्या, व्यवसाय ठप्प झाले. तरी ही अनेकांना डोळं चक्रावणारी वीज बिलं हातात पडली. आधीच लॉकडाऊनमुळं प्रत्येकाला आर्थिक चणचण जाणवत होती, त्यात महावितरण विभागाने अवाजवी बिलं दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून ग्राहकांनी महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलं.

    विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं. एकाही ग्राहकाने बिल भरू नये असं आवाहन विरोधकांनी केलं. परिणामी वीज बिलं थकीत राहिली. म्हणूनच आजच्या तारखेला एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील ४५हजार ग्राहकांकडे तब्बल ६४ कोटींची थकबाकी आहे. राज्याची ही आकडेवारी हजारो कोटीत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत धारकांची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले.

    राज्य सरकारच्या या आदेशावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. मग सरकारने तातडीनं वीज तोडणीला स्थगिती दिली. पण अधिवेशन संपलं त्याच दिवशी ही स्थगिती उठवून पुन्हा वीज तोडणीचे आदेश देण्यात आले.