काँक्रिटीकरण न करता विद्युत पोल केले उभे; आंदर मावळातील नागरिकांचा जीव टांगणीला

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यात महावितरणाच्या कारभारामुळे आंदर मावळ भागातील कुसवली गावात शेतकऱ्यांचा व  ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. चक्रीवादळात पडलेले विद्युत पोल काँक्रिटीकरण न करता वीजवाहक तार ओढून धोकादायक अवस्थेत उभे केले आहे. यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या या कारभारामुळे आंदर मावळ भागातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जीव गेल्यावर महावितरणचे डोळे उघडणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
    आंदर मावळातील कुसवली गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यानजीक तसेच शेताच्या शिवरात काँक्रिटीकरण न करता वीजवाहक तारा जोडून विद्युत पोल उभे केले आहेत. अशी परिस्थिती आंदर मावळ भागात शिवारात बऱ्याच ठिकाणी झाली आहे. शेतातील विद्युत पोलला काँक्रिटीकरण नसल्यामुळे चालू वीजवाहक तारा क्षेत्रातच लोंबकळत आहे. शेतकरी कामात मग्न असताना काँक्रिटीकरण नसल्यामुळे वीजवाहक तारा केव्हा अंगाला स्पर्श करेल, हे सा़ंगता येत नाही. तसेच चालू विद्युत पोल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन असे धोकादायक विद्युत पोल काँक्रिटीकरण करून सुस्थितीत उभा करण्याची मागणी ग्रामपंचायत दक्षता कमिटीचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ लक्ष्मण गवारी तसेच कुसवली ग्रामपंचायत सदस्या मंजुळा लक्ष्मण गवारी व ग्रामस्थांनी केली आहे.
    या परिसरात तसेच आंदर मावळ भागातील अनेक गावे असल्याने सतत रस्त्यावर वाहनांची ये-जा असते शेतकरी ग्रामस्थ देखील याच मार्गाने ये-जा करत असतात. शिवाय पावसाळा सुरू झाल्याने या परिसरात शेतीची मशागतीची कामे सुरू असल्याने शेतात लोकांची वर्दळ असते. या परिसरात पाऊस व वारा असल्यामुळे असे धोकादायक विजेचे पोल कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.
    अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष व कामचुकारपणामुळे नाहक बळी जाण्याची शक्यता
    याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन परिसरातील असे धोकादायक विजेचे खांब काँक्रिटीकरण करून सुस्थितीत उभे करून नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.