खेड पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादीकडे सत्ता पण, बहुमत असूनही शिवसेनेचा पराभव

“उध्दवसाहेब शिवसैनिकांवरील अन्यायाला वाचा फोडा. अन्यथा शिवसेना हे नाव संपून जाईल आणि शिवसेनेवरील लोकांचा विश्वास उडेल.” माजी उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या ज्योती अरगडे यांचं पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आवाहन.

    खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली.  शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद झाला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

    सभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सभापतीपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. या निवडीमुळे २४ मे पासून राजकीय सहलीवर असलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा वनवास अखेर १०१ दिवसांनी संपला. स्पष्ट बहुमत असतानाही सत्ता गेल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. खेडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने याचे पडसाद भविष्यात सर्व निवडणुकांत पडणार असल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले.

    या निवडीनंतर आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते अरुण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे शिवसैनीक मात्र नाराज झाले असून राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    यावेळी माजी उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या ज्योती अरगडे माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “उध्दवसाहेब शिवसैनिकांवरील अन्यायाला वाचा फोडा. अन्यथा शिवसेना हे नाव संपून जाईल आणि शिवसेनेवरील लोकांचा विश्वास उडेल.” असं आवाहन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केलं आहे.