अनेक भागांत दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार ; काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात अनेक ठिकाणी दोन ते तीन दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मात्र मराठवाडय़ात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

    पुणे : राज्यात अनेक भागांत दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा धोका राज्य किंवा देशाच्या किनारपट्टीला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

    ‘गुलाब’ चक्रीवादळातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. २८ सप्टेंबरला पावसाने मराठवाडय़ाला मोठा तडाखा दिला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली. ‘गुलाब’ चक्रीवादळातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव सध्या गुजरात आणि खंबातच्या आखातावर आहे. ३० सप्टेंबरला सकाळपर्यंत उत्तर-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर नव्या चक्रीवादळात होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाऊन पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता आहे.