प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सराईत गुन्हेगारांवर मोक्का तसेच तडीपारीची कारवाई मोठ्या प्रमाणात केली आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना संबंधित गुन्हेगारांकडून धक्काबुक्की तसेच मारहाण झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.

  पिंपरी: ऑन ड्युटी पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांना धमकी, धक्काबुक्की करण्यापासून मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. एवढेच नाही तर पोलिस ठाण्यातच राडा घालून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत काही जणांचे धाडस वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात पोलीसांवर हल्ल्याच्या तब्बल सात घटना घडल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणारेच असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. पोलिसच सुरक्षित नसल्याने सामान्यांचे काय असा प्रश्नही शहरवासीयांकडून केला जात आहे.

  नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलिस झटत आहेत. कोरोनाच्या भीतीने नागरिक घरात बसलेले असताना पोलिस मात्र सतत रस्त्यावर होते. या काळात त्यांनी मोलाची कामगिरी केली. मात्र, कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीसांना कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांचा सामना करावा लागत आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करताना उल्लंघन करणारेच पोलिसांशी हुज्जत घालतात. पोलीसांवर हात उचलण्यापर्यंत काहींची मजल जाते. काही घटनांमध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीसांचे मनोधैर्य खच्ची होत आहे.

  पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सराईत गुन्हेगारांवर मोक्का तसेच तडीपारीची कारवाई मोठ्या प्रमाणात केली आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना संबंधित गुन्हेगारांकडून धक्काबुक्की तसेच मारहाण झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या वर्षात पोलीसांवरील हल्ल्याच्या ६९ घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात तब्बल सात घटनांची नोंद झाली आहे. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की अशा घटना घडत होत्या. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. पोलिसांवरच गुन्हेगार हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  सप्टेंबर महिन्यातील घटना
  ५ सप्टेंबर – भोसरी एमआयडीसीत तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकी.
  ९ सप्टेंबर – तळवडे येथे दोघांची वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, धमकी.
  १८ सप्टेंबर – निगडी – प्राधिकरणात पोलिसांना तलवारीने मारून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून गेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.
  २१ सप्टेंबर – देहूरोड पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
  २२ सप्टेंबर – पिंपरीतील शगुन चौकात पाच जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेले.
  २६ सप्टेंबर – चिंचवड पोलिस ठाण्यात एकाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
  २६ सप्टेंबर – थेरगावात घटनास्थळी गेलेल्या फौजदाराशी हुज्जत घालत कॉलर पकडली.

  'नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीची तक्रार ऐकून घेत पोलिस कार्यवाही करत असतात. कायदा हातात घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.''

  आनंद भोईटे (पोलिस उपायुक्त - पिंपरी - चिंचवड)