पिंपरी चिंचवडमध्ये इंदौरप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ३ ते ५ वॉर्डमध्ये कचरा विलगीकरण होणार 

शहरामध्ये हॉकर्सकरिता ठराविक जागा निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे व्यवसायाचे ठिकाणी देखील स्वच्छता आहे. ग्राहक, नागरिकांनी कचरा टाकल्यास संबंधित हॉकर्स यांचेमार्फतच त्वरित कचरा उचलण्यात येतो. अस्वच्छता आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते.

  पिंपरी: इंदौर शहर हे मागील ४ वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरलेले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहराचे मानांकन सुधारण्याकरिता महानगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा इंदौर शहराचा पाहणी दौरा नुकताच झाला. दौऱ्यादरम्यान इंदौर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. या दौऱ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत इंदौर येथील मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेस कचरा विलगीकरणाचे कामकाजासाठी प्रायोगिक तत्वावर ३ ते ५ वॉर्डमध्ये कामकाज करण्याकरिता नेमण्यात येणार आहे. एकंदरीतच संपूर्ण शहरामध्ये राजकीय वर्गाची व नागरिकांचा आत्मियतेने सदर कामकाजामध्ये सहभाग असल्याने इंदौर शहर अनेक वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक टिकवून आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्येही महापालिकेमार्फत इंदौर शहराप्रमाणेच उपाययोजनांचा अवलंब केला जाणार असून यासाठी इंदौर महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य घेण्यात येणार आहे.

  यावेळी, इंदौर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी, महापालिकेचे मा. अति.आयुक्त व घनकचरा व्यवस्थापनाचे कामकाज पाहणाऱ्या मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. त्यामध्ये शहरातील स्वच्छता कशा प्रकारे ठेवण्यात येते व शहरामध्ये असलेल्या स्वच्छतेचे कारणाबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांचेमार्फत कचरा विलगीकरण हे ३ ऐवजी ६ प्रकारे ओला, सुका, घरगुती घातक, प्लॅस्टीक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक यानुसार वर्गीकरण करण्यात येते. तसेच प्रत्येक घरामधून वरीलप्रमाणे ६ प्रकारामध्ये विलगीकरण असल्याशिवाय कचरा स्विकारण्यात येत नाही. कचरा संकलनासाठी नियुक्त असलेल्या वाहनांचे मार्ग व वेळ कधीही बदलण्यात येत नाही. या कामकाजाकरिता प्रत्येक आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य अधिकारी, मा. आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकडे वॉकी-टॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जेणेकरून कचरा संकलन व बहनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सर्व अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळते. व त्यानुसार सदर समस्येचे तातडीने निराकरण करण्यात येते. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व मुख्य आरोग्य निरिक्षक यांना सुमो व तत्सम वर्गाची वाहने उपलब्ध करुन देण्यात आलेली असून ती सर्व वाहने पिवळ्या रंगाची आहेत. ज्यामुळे सदर वाहन कोठेही गेल्यास नागरिकांमध्ये त्याची वेगळी ओळख असून कामकाजावर वचक देखील ठेवणे शक्य होते. ज्याप्रमाणे निवासी परिसरामध्ये वाहनांचे गट ब वेळ निश्चित आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक/व्यापारी आस्थापनांमधील कचरा संकलनाची पध्दत व वाहनांचे गट व वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. छोट्या वाहनांद्वारे संकलिन करण्यात आलेला कचरा हा कचरा स्थानांतरण केंद्रामध्ये आणण्यात येतो. त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या स्टेशनरी कॉम्पॅक्टरमध्ये विलगीकृत अमलेला कचरा टाकण्यात येतो. अनेक छोट्या वाहनांमधील कचरा हा कॉम्पॅक्ट स्वरुपात स्टेशनरी कॉम्पॅक्टरद्वारे हुक लोडरमध्ये टाकला जातो. त्याद्वारे कचरा डेपोपर्यंत त्याचे वहन केले जाते. इंदौर शहरामध्ये असलेले कचरा स्थानांतरण केंद्र हे प्रशस्त जागेमध्ये कार्यान्वित असून रहिवाशी सोसायट्यालगत ते स्थापित करण्यात आलेले आहे. तथापि, कचरा विलगीकरण स्वरुपात टाकला जात असल्याने केंद्रालगत असलेल्या सोसायट्यांमधून बामाबाबत कोणतीही तक्रार नाही. तसेच कचरा वहनाकरिता कार्यान्वित असलेल्या सदर प्रक्रियेमुळे इंदौर शहरामध्ये कचराकुंड्यांमध्ये छोट्या वाहनांमार्फत कचरा टाकण्याची आवश्यकता भासत नाही, तसेच सर्व निवासी/व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरा विलगीकरण होत असल्याने व कचरा संकलनाचे वाहन वेळेत कचरा संकलन करीत असल्याने कचराकुंडीची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे संपूर्ण शहर कचराकुंडी विरहित आहे. मंडईमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता बायोमिथिनेशन (सीएनजी गॅस) प्लेट कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्याठिकाणी मंडईमधील सर्व कचरा टाकण्यात येतो. त्यावर प्रक्रिया करुन सीएनजी गॅस तयार केला जातो. सदर गॅस हा र.रु.५८/- प्रति किलो या दराने महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसकरिता पुरविण्यात येतो. सदर प्रकल्प मे महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा कंपनीमार्फत संचलित असून मंडईमधील सर्व कचरा त्याद्वारे प्रक्रिया केला जातो.

  शहरामधील दोन नद्यांमध्ये नदी सुधार प्रकल्प राबविलेला असून गटारात रुपांतरित झालेल्या नद्या पुनर्जिवीत करण्यात आलेल्या आहेत. नदी किनाऱ्यावर हॅगींग गार्डन, रिटेनिंग वॉल बांधण्यात आलेली असून त्यावर आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. तसेच नदी सतत स्वच्छ ठेवण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित आहे. इंदौर शहरामध्ये इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल रूम स्थापित करण्यात आलेली असून त्याठिकाणी शहरातील विविध उपक्रमांची रिअल टाईम माहिती उपलब्ध होते. त्यामध्ये कचरा संकलनाची वाहनांचे व्हीटीएस यंत्रणेद्वारे मॅपिंग व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे कोणत्याही घराचा कचरा उलण्यापासून राहत नाही. इंदोर शहरामधील सर्व रस्ते हे पूर्णत: कड्यापर्यंत बांधणी करण्यात आलेली असून रस्त्याच्या कडेला कोणत्याही ठिकाणी माती दिसून येत नाही. तसेच रस्त्याचे कोठेही खोदकाम करण्यात आलेले नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकारी यांचेमार्फत फिरती दौऱ्यादरम्यान आढळून आले. तसेच शहरामध्ये मेट्रोचे काम सुरु असून त्याच्या दुतर्फा आच्छादन करण्यात आलेले आहे.

  कोणतेही खोदकाम अथवा माती दिसून येत नाही. त्याचबरोबर सर्व पदपथ व दुभाजक हे निटनेटके असून रंगरंगोटी केलेले आढळून आले. त्यामुळे शहरामधील रस्ते हे आकर्षित दिसतात व कचरा आढळून येत नाही. तसेच ठिकठिकाणी लिटर बिन्स बसविण्यात आलेल्या असून त्या ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून आलेले नाही.

  शहरामध्ये हॉकर्सकरिता ठराविक जागा निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे व्यवसायाचे ठिकाणी देखील स्वच्छता आहे. ग्राहक, नागरिकांनी कचरा टाकल्यास संबंधित हॉकर्स यांचेमार्फतच त्वरित कचरा उचलण्यात येतो. अस्वच्छता आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. या हॉकर्स करिता छप्पन बझार या नावाने हॉकर्स झोन तयार केले आहे. इंदौर शहरामध्ये झाडलोट कामकाज हे तीन शिफ्टमध्ये करण्यात येते. निवासी परिसरात २ वेळा व व्यापारी परिसरात ३ वेळा झाडलोट होते. तसेच स्वच्छतेचे कामकाजाकरिता महानगरपालिकेकडे ९००० कर्मचारी उपलब्ध आहेत, त्याचबरोबर यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करण्यात येत असून केवळ रात्रपाळीमध्येच मुख्य रस्त्यांची सफाई केली जाते. जेणेकरुन सकाळी शहरामध्ये स्वच्छता दिसून येते. दि. २ जुलै २०२१ रोजी शहरातील कंट्रोल कमांड सेंटर, घरोघरचा कचरा संकलन, झिरो वेस्ट वॉर्ड असलेला वॉर्ड क्र. ७३ व काही उद्याने यांना भेट दिली. तसेच तेथील मा. आयुक्त श्रीमती पाल यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मा. आयुक्त यांनीही कचरा विलगीकरण हे शहर स्वच्छतचे एकमेव कारण असल्याचे सांगितले. मागील ४ वर्षापासून विलगीकरणाचे कामकाज हे मे. बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स या संस्थेमार्फत करण्यात येत असून शहरामध्ये १०० % विलगीकरण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच होम कंपोस्टींग वर देखील अधिक भर देण्यात आल्याचे त्यांनी विषद केले.

  नगरसदस्यांमार्फत देखील सदर कामकाजामध्ये स्वतःहून सहभाग नोंदविण्यात येत असल्याने व त्यांना त्यांचे वॉर्डातील सर्व नागरिकांची माहिती असल्याने कचरा विलगीकरणासंबंधी त्यांचेद्वारे जनजागृती करण्यात येते. वॉर्ड क्र. ७३ हे झिरो वेस्ट वॉर्ड असून संपूर्ण वॉर्डमध्ये ४३२६ घरे आहेत. वॉर्डातील प्रत्येक घरामार्फत ओला कचऱ्याचे कंपोस्टींगद्वारे विल्हेवाट लावत असून ते खत म्हणून उपयोगात आणले जाते. तसेच वॉर्डातील सुका कचऱ्याची विल्हेवाट कबाडीवाल्यामार्फत लावली जाते. त्यामध्ये इंदौर महानगरपालिका मदत करत असल्याचे तेथील पाहणीमध्ये दिसून आले आहे. तथापि, ज्या नागरिकांकडे होम कंपोस्टीगकरिता जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणचा कचरा कंपोस्टींग करिता मे. स्वाहा एजन्सी यांचेमार्फत मोबाईल वेस्ट प्रोसेसर या वाहनाद्वारे उचलण्यात येते. त्याकरिता संबंधितांकडून प्रतिकिलो नुसार दर आकारण्यात येतो. शहरामध्ये काही उद्यानांची देखील पाहणी करण्यात आलेली असून सर्व उद्याने अतिशय स्वच्छ असल्याचे व प्रत्येक उद्यानांमध्ये ग्रीन वेस्टकरिता कंपोस्टींग ची सुविधा करण्यात आल्याचे दिसून आले. उद्यानांमधील बहुतांश झाडांना तिहेरी रंगामध्ये रंगविण्यात आलेले होते, तथापि, सदर रंग हे झाडांकरिता हानीकारक नसल्याचे व गुजरातमधून मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्यानातील स्वच्छता व आकर्षक रंगसंगतीमुळे उद्यानांमध्ये प्रसन्न वाटते.

  इंदौर शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात आलेला असल्याने शहरामध्ये कोठेही झोपडपट्टी राहिलेल्या नाहीत. तसेच शहरातील नाल्यांमध्ये कोठेही कचरा अथवा ड्रेनेज जोडण्यात आलेले नसल्याने पावसाळ्याव्यतिरिक्त नाले पूर्णत: कोरडे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये केअर टेकर नेमण्यात आले असल्याने त्यांची स्वच्छता देखील योग्यरितीने होत असल्याचे दिसून आले. संपूर्ण शहरामध्ये फिरतांना असे आढळून आले की शहरातील सर्व भिंतींवर चित्रीकरण व स्वच्छतेबाबत तसेच कोविड लसीकरणाबाबत घोषवाक्य लिहीण्यात आलेली आहेत. तसेच रस्त्यांवरील सर्व जंक्शन, सर्कल येथे फलक लावण्यात आलेले असून त्यावरदेखील लसीकरण व स्वच्छतेबाबत नागरिकांचे प्रबोधनपर संदेश लावण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे स्वच्छतेचे व लसीकरणाचे ब्रँडीग करण्यात आलेले असून त्यामध्ये कोठेही राजकीय व्यक्तींचे फोटो अथवा नावे दिसून आली नाहीत. तसेच दौऱ्यादरम्यान काही स्थानिक नगरसदस्यांची देखील भेट घेण्यात आली. त्यांचेमार्फत स्वच्छेने व उत्स्फूर्तपणे सदर कामकाजात सहभाग घेत असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. इंदौर शहराच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातही तेथील उपाययोजनांचा अवलंब करण्यात येणार आहे.