पुण्यात घराच्या किंमती महागण्याची शक्यता, बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या

आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून लॉकडाऊनसुद्धा हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने घरांच्या किंमतीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील बांधकाम प्रकल्पांना उशिर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    पुणे : कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोना विषाणूचा फटका हा सर्वच क्षेत्राला बसला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असतानाच महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे परत लॉकडाऊन लावण्यात आला. आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून लॉकडाऊनसुद्धा हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने घरांच्या किंमतीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील बांधकाम प्रकल्पांना उशिर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय क्रेडाईच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या २४ मे ते ३ जूनदरम्यान देशातील टीअर I, II, III अशा एकूण २१७ शहरांमधील बांधकाम व्यवसायाचा यावेळी आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.

    पुणे शहराचा विचार करता प्रामुख्याने ९४ टक्के व्यावसायिकांना बांधकाम मजुरांची कमतरता भासत आहे तसेच बांधकामासाठी आवश्यक साहित्याच्या किंमती आणि बांधकाम परवानग्या मिळण्यास होणारा उशीर इत्यादी गोष्टींचा शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच बांधकाम साहित्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे घरांच्या किंमतीतसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.

    तसेच तब्बल ५२ टक्के बांधकाम व्यावसायिकांना कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. तर तब्बल ९१ टक्के व्यावसायिकांना ग्राहकांकडून नियोजित खरेदी रक्कम मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे. कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी घर घेण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्याशिवाय सध्या पुणे शहरातील ४४ टक्के बांधकाम व्यावसायिक २५ ते ५० टक्के कमी क्षमतेने काम करत आहेत. बांधकाम साहित्य आणि मजुरांसाठी येणाऱ्या खर्चात १० ते २० टक्के वाढ झाल्याचे ५४ टक्के व्यावसायिकांचे मत आहे. बांधकामासाठी परवानग्या वेळेत मिळत नाहीत असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

    बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टील आणि सिमेंटच्या किंमतीसुद्धा सातत्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांची संख्या कमी होत आहे. अश्या परिस्थितीत केंद्र सरकारने स्टील आणि सिमेंटच्या किमतींवर नियंत्रण आणावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.