पुणे-सोलापूर महामार्गावर दोन ट्रक आणि कंटेनरचा विचित्र अपघात ; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुणे - सोलापूर महामार्गावर आज पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    लोणी काळभोर: पुणे – सोलापूर महामार्गावर आज पहाटे दोन ट्रक व कंटेनर या तीन अवजड वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर व क्लीनर मृत्यूमुखी पडले असून कंटेनर मधील एकजण गंभीर जखमी झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रकमधील ड्रायव्हर अनिल अंकुश व क्लिनर शकील इस्माईल शेख व अनिल अंकुश सूर्यवंशी हे दोघे मृत्यूमुखी पडले आहेत. तर कंटेनर मधील आण्णासाहेब गणपत गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    पोलिसांनी या घटनेची तपासणी केली असून दिलेल्या माहितीनुसार, सदर अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारांस कुंजीरवाडी गावच्या हद्दीत धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोर झाला आहे.

    अपघातातील कंटेनर हा पुणे-सोलापूर महामार्गावरून उलट दिशेने येवून धनश्री लॉन्स मंगल कार्यालयासमोरून सोलापूर – पुणे महामार्गाकडे वळत होता. त्याचवेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेला ट्रक त्याला धडकला. यामुळे ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. याचवेळी आंध्र प्रदेश वरून पुणे बाजूकडे फरशी घेऊन निघालेला ट्रक कंटेनरला अडकला.