भाजपमध्ये विझलं राष्ट्रवादीत पेटलं ; राष्ट्रवादीने सदस्यांना नाेटीस बजावली

-मनुष्यबळ पुरविण्याच्या ठेक्याला दिली होती मुकसमंती

    पुणे : महापालिकेला मनुष्यबळ पुरविण्याच्या ठेक्यावरुन भाजपमधील वाद तुर्तास शमला असला तरी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मात्र याचे पडसाद उमटले आहे. या प्रस्तावाला मुकसमंती देणाऱ्या स्थायी समितीमधील आपल्या सदस्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने नाेटीस बजावली आहे.

    महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम कोणत्या ‘नेत्याशी’ संबधित कंपनीला द्यायचे, यावरून सत्ताधारी भाजपच्या महापालिकेतील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी वाद झाला. अखेर एका पदाधिकाऱ्‍याला मुंबईच्या नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यात यश आले आणि ताे ठेका संबंधित ‘लाड’ क्या नेत्याशी संबंधित कंपनीला मिळाला. या नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यासाठी शहरातील महापािलकेची सर्व वाहनतळे ( पार्किंग )चालविण्याचा कोट्यवधी रुपयांची निविदाही याच नेत्याच्या कंपनीसाठी काढण्यात आल्याची चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान कंत्राटी कामगार पुरविण्याची निविदा स्थायी समितीसमाेर मान्यतेकरीता ठेवली गेली हाेती. यावरून भाजपच्या दाेन पदाधिकाऱ्यांत वाद झाले. हे वाद तुर्तास शमले असले तरी त्याची झळ आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बसली आहे.

    सदर प्रस्तावाला राष्ट्रवादी काॅंग्रेसने विराेध करण्याचा निर्णय घेतला हाेता. या समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सदस्यांनी मुकसंमती दिल्याने पक्षाने बुधवारी पक्षाच्या तीन नगरसेवकांना नाेटीस बजावून खुलासा मागविला आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चार सदस्य असुन, एक महीला सदस्य प्रकृतीच्या कारणामुळे या बैठकीला उपस्थित राहु शकणार नव्हती. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या नेत्यांना कळविले हाेते. त्यामुळे त्यांच्याकडून खुलासा मागविला गेला नाही. यापुर्वी ई बाईक्स आणि चार्जिंग स्टेशनच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचा िवराेध हाेता, तेव्हाही सदस्यांनी मुकसंमती दिली हाेती, त्यावेळी देखील पक्षाने या सदस्यांना नाेटीस देऊन खुलासा मागविला हाेता.