corona vaccine

-शनिवारपासून होणार लसीकरणास सुरूवात

बारामती: बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकिय सुमारे ३ हजार ५०० आरोग्य कर्मचा-यांना शनिवार दि १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.बारामतीकरांना ही दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना महामारीमुळे भारतासह जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. भारतात कोरोना लसीकरणास सुरुवात झाल्याने देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आरोग्य कर्मचा-यांचा कोरोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये१ व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत.त्यानुसार २५ आरोग्य कर्मचा-यांना मंगळवारी (दि. १२) पुणे येथे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १ हजार २७८ शासकिय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकिय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचा-यांनी कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी बारामती औद्योगिक वसाहतीतील शासकिय महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. लस घेण्यापूर्वी सबंधीत आरोग्य कर्मचा-यांची संपुर्ण शाररिक तपासणी करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यात पोलीस , होमगार्ड, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे. तर पुढील तिसºया टप्प्यात साठ वर्षा पुढील व्यक्तींना तसेच मधुमेह व रक्तदाब असणा-या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्य वेळी सूचना देण्यात येतील ,असे डॉ खोमणे यांनी सांगितले.

कोरोनाची लस दिल्यानंतर सबंधीत आरोग्य कर्मचा-याला सुमारे आर्धातास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीस लसीकरण केल्यानंतर त्रास सुरू झाल्यास प्राथमिक उपचारासाठी एएसआय किट याठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.

कोरोनाची लस उपलब्ध झाली असली तरी नागरीकांना ही लस देण्यास वेळ लागणार आहे, त्यामुळे नागरीकांनी तोंडाला मास्क वापरावा, हाताला नेहमी सॅनीटायझर वापरावा, व सोशल डिस्टन्सिंग चा वापर करावा.

डॉ मनोज खोमणे , तालुका वैद्यकीय अधिकारी.