मोफत लसीकरण असतानाही लस देण्यासाठी पैसे घेणारा ACB च्या जाळ्यात; शासकीय रुग्णालयात कारवाई

कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस मिळवण्यास आणखीही नागरिकांना वाट पहावी लागत आहे. त्यातही मोफत मिळवण्यासाठी ऑनलाइन नोंदणी व रांगेत उभे रहावे लागते.

    पुणे: शासकीय रुग्णालयात कोरोनाची लस (Corona vaccine)मोफत असताना देखील पैश्यांची मागणी करत १ हजार रुपयांची लाच घेताना मदतनीस तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau)एसीबीने रंगेहात पकडले आहे. चाकण रुग्णालयात ही कारवाई करण्यात आली आहे. सचिन अरुण शिंदे (वय ३८) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस मिळवण्यास आणखीही नागरिकांना वाट पहावी लागत आहे. त्यातही मोफत मिळवण्यासाठी ऑनलाइन नोंदणी व रांगेत उभे रहावे लागते. दरम्यान यातील तक्रारदार तरुण यांचा पहिला ढोस झाला होता. त्यांना दुसरा ढोस घ्यायचा होता. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांना देखील दुसरा ढोसची तारीख होती. त्यामुळे त्यांनी चाकण येथील शासकीय रुग्णालयात लस घेण्यासाठी माहिती घेतली. त्यादरम्यान रुग्णालयातील (येथे मदतनीस म्हणून काम पाहणारा) खासगी व्यक्ती सचिन शिंदे याने तक्रारदार यांना प्रत्येकी ३०० रुपये असे १ हजार५०० रुपयांची लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी एसीबीत तक्रार दिली. त्याची पडताळणी झाली. त्यानुसार गुरुवारी सापळा कारवाईत तडजोडी अंती १ हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे.