भाजपापूर्वीच राष्ट्रवादीच्यावतीने भक्ती शक्ती चौकात उड्डाण पूलाचे उद्घाटन

राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा उड्डाण पूल साकार होत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारा एक मार्ग पूर्ण झाला असून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाच्या उद्घाटन भाजपापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसने या पुलाचे लोकार्पण करून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे

संजोग वाघेरे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा उड्डाण पूल साकार होत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारा एक मार्ग पूर्ण झाला असून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा आम्ही महापालिका प्रशासनाकडे व्यक्त केली होती. मात्र भाजपाने श्रेय लाटण्यासाठी या पुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते घाईघाईत करण्याचा घाट घातला होता. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.