महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ; ‘क्राईम इन महाराष्ट्र २०१९’ अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक‌ गुन्हे मुंबई शहरात दाखल आहेत. २०१९ या कालावधीत मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे ६ हजार ५१९ गुन्हे दाखल आहेत

    पुणे: ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे, या अहवालानुसार महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक‌ गुन्हे मुंबई शहरात दाखल आहेत. २०१९ या कालावधीत मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे ६ हजार ५१९ गुन्हे दाखल आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

    या अहवालानुसार २०१९ मध्ये खून, दरोडा, मालमत्तेविरोधातील गुन्ह्यात घट झाली आहे तर जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी असल्याचेही समोर आले आहे. देशात २०१९ मध्ये‌ ३२ लाख २५ हजार ७०१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ८४ गुन्हे महाराष्ट्रातील आहेत.

    राज्यातील गुन्हेगारीच्या स्थितीचा आढावा मांडणाऱ्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालाचे प्रकाशन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच झाले. विशेष महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, पोलीस अधीक्षक अशोक धिवरे, पल्लवी बर्गे, संभाजी कदम, अतिरिक्त अधीक्षक आरती‌ बनसोडे उपस्थित होते.

    राज्यात सर्वाधिक गुन्हे घडण्याचे प्रमाण अमरावती शहरात नोंदवले गेले आहे. तेथील गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण १४२.५५ टक्के आहे. २०१८ च्या तुलनेत‌ २०१९ मध्ये अनुसूचित जमातींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ८.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दखलपात्र गुन्हे सिद्ध करण्याचे
    प्रमाण ४८.९५ टक्के होते. २०१९ मध्ये राज्यात १८ हजार ९१६ जणांनी आत्महत्या केल्या. १४ हजार ६०८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जबरी चोरीच्या गुन्ह्यात ४.४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८९१ गुन्हे दाखल झाले आहेत.