खेड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ ; पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

अन्न व औषध प्रशासनाने कितीही मोठी धडक कारवाई केली तरी दोन तीन दिवसांनी गुटखा पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसते. या गुटखा व्यासायिकांनी कायद्याच्या सर्वंच नियमांची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून येत आहे. पोलीस विभागाने अनेक वेळा या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली तरी सर्वत्र गुटखा विक्री जोरात चाललेली दिसते.

  राजगुरूनगर : खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर घटना घडत असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी तडीपार गुंडाचा निर्घृणपणे खून झाल्याने शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरात गावठी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. अनेक हॉटेल व ढाब्यावर दारू विक्री खुलेपणाने होत आहे. दुपारी चार नंतर अनेक दुकाने चालू राहूनही त्यावर कारवाई होत नाही. शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेरील दुकानदार गुटखा विक्री करण्यात मशगुल आहेत. परिसरात बैलगाडा शर्यतींचे आयोजन होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

  खेड तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावात कोरोनाच्या काळातही अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा सुरू होतो. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष व निमगावचे पोलिस पाटील बाळासाहेब शिंदे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

  ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असताना दारु विक्रीला जोर आल्याने नागरिकामधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या पुर्व भागातील दावडी, निमगाव, कनेरसर, वाफगाव या ठिकाणी अवैध दारु विक्री खुलेआम सुरु आहे. खेड ते दावडी , खेड ते वाफगाव, तसेच खेड ते कनेरसर या रस्त्यालगत ठिकठिकाणी ढाब्यावर अवैधरित्या दारू मिळत आहे. अवैध दारू विक्रेताचे ढाबे रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी तळीरामाची नेहमी गर्दी असते. तळीराम रस्त्यावरच गाडी पार्क करून जात असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांनमध्ये अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे. एकीकडे या परिसरात कोरोनाचा रुग्न आढळून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह या भागातील

  सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे या भागात अवैध दारु विक्रीला जोर आला असून दारुच्या अड्डयावर अनेक तळीराम मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. अवैध दारुचे अड्डे मात्र खुलेआम सुरु आहेत. दारू विक्री करणार्‍यांची दहशत असल्यामुळे तसेच बीट अंमलदाराशी अर्थिक जवळीक असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही.

  खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी, मंदिरात चोऱ्या, शेतकऱ्याच्या कृषी पंपाच्या व केबलच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक भयभयीत झाले असुन पोलीसांनी या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

  राजगुरूनगर शहरात चोरटे सुसाट आहेत. भरदिवसा वाहने चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. चोरट्यांनी शहरातून वाहने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. खेड तालुक्यात गेल्या काही महिन्यापासुन चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटरसायकल, मंदिरफोडी, शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या चोऱ्या वाढल्या आहेत. खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन गेल्या काही महिन्यात मोटारसायकल चोरीस गेल्या त्यांचा तपास लागला नाही. मागील काही दिवसांत राजगुरुनगर शहरातील संजय गीताराम कौदरे यांच्या घराच्या पार्किंग येथुन ७० हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल चोरीस गेली. शहरातील तेलीआळी बाजारपेठ येथुन कडेला चावीसह भिमय्या शिवप्पा मंजालवर यांची मोटारसायकल पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने लांबवली. चोरटा सी सी टिव्हीमध्ये कैद झाला आहे. दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असुन त्याचप्रमाणे रेटवडी येथील एका कंपनीतुन अज्ञात चोरट्यांनी २ लाख ८० हजाराच्या बॅटऱ्या लांबविल्या. काही दिवसापुर्वी

  कडुस आर. बी. कृष्णाजी फार्म येथुन पोकलँण्डच्या बँटऱ्या तसेच इतर साहित्य असा १० हजार किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. लक्ष्मण रामभाउ मुके (रा. चिखलगाव) यांनी आराळा नदीचे किनारीलगत बसविलेल्या कृषी मोटारीचे  १० हजार रुपये किंमतीची पाचशे फुट लांबीची तांब्याचे तारा असलेली केबल अज्ञात चोरट्याने लांबवली. मागील महिन्यात मांजरेवाडी (पिंपळ ) ता खेड येथे अज्ञात चोरट्यांनी भिमा नदीवरील दोन शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरून नेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४०हजार रुपायांचे नुकसान झाले. चार दिवसापुर्वी गारगोटवाडी येथे मंदिराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदिचे दागिने लाबविले. तसेच घनवटवाडी येथेही चोरट्यांनी मंदिरारात प्रवेश देवाची चांदिची मुर्ती व मुखवटा लांबविला या दोन्ही घटनेत सुमारे १ लाख १४ हजाराचा ऐवज चोरीला गेला. यांचा तपास बाकी अजुन दिवसेंदिवसे चोरिच्या घटनात वाढ होताना दिसत आहे. खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत व राजगुरूनगर शहरात व तालुक्यात चोरटे सुसाट झाले असुन याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. या चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

  कोरोनाबाबत सर्व जण काळजी घेत असले तरी थुंकीतून वाढणाऱ्या करोना संसर्गाला खेडमध्ये गुटखा विक्रीतून आमंत्रणच मिळत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण आहे परिसरात सर्वत्र सहज मिळणारा गुटखा. पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

  खेडमध्ये गुटखा व पान मसाल्याची खुलेआमपणे विक्री होत असून प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. या गुटखा विक्रीतून अनेक गुटखा विक्रेते लाखोंची कमाई करत आहेत. प्रशासन सुस्त झाले असून गुटखा विक्रेते मात्र तृप्त झाले आहेत. अनेकांनी आपले मोठे बस्तान बसवले आहे. यासाठी सर्वत्र मोठी आर्थिक देवाण घेवाण होते. परंतु, अनेकदा दबाव आल्यावर एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करुन विषयाला बगल दिली जाते.

  अन्न व औषध प्रशासनाने कितीही मोठी धडक कारवाई केली तरी दोन तीन दिवसांनी गुटखा पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसते. या गुटखा व्यासायिकांनी कायद्याच्या सर्वंच नियमांची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून येत आहे. पोलीस विभागाने अनेक वेळा या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली तरी सर्वत्र गुटखा विक्री जोरात चाललेली दिसते. राज्य शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी केली असूनसुद्धा सर्व ठिकाणी गुटखा राजरोसपणे व सहज उपलब्ध आहे.

  गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून त्यामुळे करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची दाट शक्‍यता आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्‍टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस जीव धोक्‍यात घालून काम करीत आहे. करोनाबाधित रुग्णाच्या थुंकी अथवा नाका- तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास करोनाची लागण होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. एका दिवसात जिल्हयात आठशे- नऊशे करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यावर शासनाकडून कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित होते.

  परंतु सध्या अवैधरित्या गुटखा विक्रीने समांतर बाजारपेठ निर्माण केली आहे. तर यात कोट्यवधी रुपयाची उलाढाल महिन्याला होत आहे. बाजारपेठेत या व्यवसायात मोठी साखळी आहे. आतापर्यंत अनेक वेळा कारवाया झाल्या. पण कार्यवाही होऊनसुध्दा गुटखा विक्री जोरात सुरू आहे. अशा मुजोर अवैध गुटखा माफियांवर प्रशासनाने कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून यांच्यावर कायद्याची जरब बसेल व तरुण पिढी यातून बाहेर येईल, असे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले.