एसटी बसेसच्या संख्येत पुणे विभागातून वाढ ; विभागातून दररोज सुमारे १७५ बसेस सेवेत

राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसने देखील आगामी काळात बसेस वाढविण्याचे नियोजन केले आहे. पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरुर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आदी आगारांतून बसेसचे नियोजन केले आहे.

    पुणे : प्रवासी संख्या घटल्याने आणि निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर मागील काही दिवसांपासून एसटी स्थानके ओस पडली होती. मात्र, निर्बंध शिथिल करताच प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. तर बसेसच्या संख्येतदेखील महामंडळाने वाढ केली असून, पुणे विभागातून दररोज सुमारे १७५ बसेस राज्यभर धावत आहेत.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू केल्याने मूळगावी परतणाऱ्या नागरिकांची एसटी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र त्यानंतर कायमच गर्दीने फुललेली स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन ही स्थानकांत शुकशुकाट होता. प्रवासी संख्या मागील महिनाभर बसेसची संख्या देखील घटली होती

    राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसने देखील आगामी काळात बसेस वाढविण्याचे नियोजन केले आहे. पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरुर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आदी आगारांतून बसेसचे नियोजन केले आहे.

    पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील बसेसच्या संख्येत वाढ केली आहे. याशिवाय सातारा, सोलापूर, मुंबई आदी भागांतदेखील बसेस सोडण्यात येत आहे. सोमवारी दुपारनंतर विविध स्थानकांतून सुमारे १३२ हून अधिक बसेस धावल्या आहेत. दरम्यान, मास्क परिधान केल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.