‘दुकानांची वेळ वाढवा नाहीतर…’; व्यापारी महासंघाचा इशारा

कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे, तसेच मृत्यूदर आटोक्यात आला आहे. त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून द्या अन्यथा आम्ही बुधवारपासून सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवू, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे.

    पुणे : कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे, तसेच मृत्यूदर आटोक्यात आला आहे. त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून द्या अन्यथा आम्ही बुधवारपासून सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवू, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाने दिला आहे. तसेच राज्य सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी घंटानाद आंदाेलन करण्यात येणार आहे.

    यासंदर्भात पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परीषदेत भूमिका मांडली. यावेळी व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया, रतन किराड, नितीन काकडे, मनोज शहा, अभय व्होरा, मनोज सारडा, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक आदी उपस्थित होते.

    दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी करून पंधरा दिवस झाले आहेत. परंतु, शनिवारी महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील व्यापारी दुकानांवरील निर्बंध अद्याप कायम ठेवले. व्यापारी वर्गाने दुकानांवरील निर्बंध मागे घेण्याची विनंती शासनाकडे केली असून, याबाबत योग्य निर्णय न झाल्यास ४ ऑगस्टपासून शहरातील सर्व व्यापारी दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा इशारा पुणे व्यापारी महासंघाने रविवारी दिला.

    कोरोनाबाधितांची संख्या येतीये आटोक्यात

    शहरात पाच एप्रिलपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आलेली आहे. चार महिने उलटून गेले तरी निर्बंध कायम आहेत. शहरातील ४० हजार व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत विचार विनियम करण्यासाठी रविवारी (१ ऑगस्ट) व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शासनाने व्यापारी वर्गासाठी अनुकूल निर्णय न घेतल्यास ३ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते सव्वा बारा यावेळेत घंटानाद आंदोलन तसेच ४ ऑगस्टपासून सर्व व्यापारी दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, असे रांका यांनी सांगितले.