चिनी वस्तूंवरील करात वाढ करा  : गजानन बाबर

पिंपरी : चीन भारताला कधीच सहकार्य करत नाही. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील बनावट रॅपिड टेस्टिंग कीट पाठवून हे त्यांनी हे सिद्ध केले आहे. चीनी वस्तुंनी आपल्या देशाची मोठी बाजारपेठ काबीज केली

पिंपरी : चीन भारताला कधीच सहकार्य करत नाही. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील बनावट रॅपिड टेस्टिंग कीट पाठवून हे त्यांनी हे सिद्ध केले आहे. चीनी वस्तुंनी आपल्या देशाची मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे या वस्तूंवर केंद्र सरकारने कर वाढवून लोकांना चिनी वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त केले पाहिजे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे.
याबाबत बाबर यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चिनी वस्तूंवर प्रत्यक्ष बंदी घालणे शक्य नाही.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या चिनी वस्तूंवर केंद्र सरकारने कर वाढ करावी, जेणे करून भारतीय नागरिक चिनी वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त होतील. तसेच चिनी वस्तू खरेदी केल्या तरी वाढीव कराची रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. त्याचबरोबर सरकारने स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीबरोबर विक्रीला प्रोत्साहन द्यावे. स्वदेशी वस्तूंची निर्मिती आणि विक्री वाढल्यामुळे देशाला आर्थिक फायदा होईल, असे मत बाबर यांनी मांडले आहे. चिनी वस्तू जास्त टिकाऊ नसतात पण खूप स्वस्त व आकर्षक असल्याने भारतीय नागरिक त्याच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनी वस्तूंवर कर वाढवणे हा एकमेव उपाय असल्याचे बाबर यांनी म्हटले आहे.