राज्यात शिक्षणाचा इंदापूर पॅटर्न राबविणार

अंकिता पाटील यांचा संकल्प
इंदापूर :    महाराष्ट्र शासनाचा ऑनलाईन शिक्षण उपक्रम सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने ग्रामिण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील आॅनलाईन शिक्षणाचा “इंदापूर पॅटर्न” संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प असून ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कसे जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पूणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील एस.बी.पाटील पाॅलीटेक्निक इंजिनिअरिग काॅलेज वनगळी येथे बोलताना व्यक्त केले.

अंकिता पाटील या शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर व श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस.बी. पाटील पाॅलीटेक्निक व इंजिनिअरिंग काॅलेज  वनगळी येथे ऑनलाईन शिक्षण परिषदेत बोलत होत्या.त्यावेळी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे, एस. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण नेमाडे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज, नारायणदास रामदास हायस्कूल चे मुख्याध्यापक विकास फलफले, शिवाजी एज्युकेशन बावडा चे मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे  आत्यादी प्रमुख होते.

यावेळी आंकिता पाटील बोलताना पुढे म्हणाल्या की यापूर्वी आपण मुलांना मोबाईल देत नव्हतो परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे आता सर्वकाही शिक्षण मोबाईल वरती होत असल्यामुळे आपल्याला मुलांना मोबाईल द्यावा लागत असुन त्यासाठी इंदापूर पॅटर्न राज्यात अग्रेसर ठरेल. यासाठी राज्यात शिक्षणाचा आॅनलाईन पॅटर्न रूजविण्याचा संकल्प असुन तो यशस्वी करण्याचा संकल्प केला असल्याचे अंकीता पाटील यांनी सांगीतले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर मार्गदर्शन केले.