अखेर ‘त्या’ कामगाराची मृत्यूशी झुंज अपयशी; १८ दिवसांनी मृत्यू

    पाटस : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथे विटभट्टीचे मालकाशी जुन्या वाद होता. मात्र, मालकाचा हा वाद कामगाराच्या अखेर जीवावर बेतला असून, त्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. या कामगाराची १८ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १८ दिवस या कामगारावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.

    चौफुला-सुपा रोडलगत देऊळगावगाडा हद्दीतील सोमनाथ विक्रम शिंदे यांची विट्टभट्टी आहे. सोमनाथ शिंदे आणि अंकुश शिंदे यांचा जुना वाद होता. २९ जूनला या वादाच्या कारणावरून सोमनाथ शिंदे यांच्या विट्टभट्टीवरील कामगार गोविंद सुकलाल (मूळ रा. नेपानागर, जि. बुराणपुर, मध्य प्रदेश, सध्या रा.देऊळगावगाडा) यास दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बेटपाटीजवळ मोकळ्या मैदानात नेऊन डोक्यात, तोंडावर दगडाने आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहणीत कामगार गोविंद सुकलाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे मागील १८ दिवस त्यांच्यावर पुणे येथील ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी (दि.१६) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    याप्रकरणी अंकुश वसंत शिंदे (वय २७, रा. देऊळगावगाडा ता.दौंड.जि.पुणे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. या हल्ल्यात कामगार गोविंद सुकलाल यांचा मृत्यू झाल्याने अकुंश शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून वाढ केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी दिली.