कापूरहोळ सुरूर रस्त्याची पाहणी

आशियाई बँकेंच्या अर्थसहाय्याने होणार रस्त्याचे काम
भोरः आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून होणाऱ्या कापूरहोळ ते वाई तालुक्यातील सुरूर रस्त्याच्या ‘लिडर’ सर्व्हेक्षणाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता अजय भोसले, उपअभियंता आर. एल. ठाणगे, शाखा अभियंता योगेश मेटेकर आदी उपस्थित होते. राज्य मार्ग ११९ अंतर्गत कापूरहोळ, भोर,अंबाडे ते वाई तालुक्यातील सुरूर असा ५७.६९ किलोमीटर लांबीचा या योजनेतून जिल्हयात एकमेव रस्ता होणार आहे. सर्व्हेक्षणाचे काम मार्चअखेर होणे अपेक्षित होते,परंतु करोनामुळे ते लांबले. तयार केलेल्या डीपीआरनुसार चव्हाण यांनी कापूरहोळ ते सुरूर पर्यंत पाहणी केली. त्या प्रमाणे आवश्यक तेथे दुरूस्ती,नवीन पर्यायांची माहीती यावेळी दिली.
-छोटया पुलांचे नव्याने बांधकाम होणार
नवीन कामांत रस्त्याचे दुपदरीकरण,पेव्हड शोल्डर व छोटया पुलांचे नव्याने बांधकाम होणार आहे. त्यासाठी अंदाजे १८० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. भोर ते कापूरहोळ या १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर चार मोठे पूल व अनेक लहान मोऱ्या आहेत. हरताळी फाटा व सांगवी जवळच्या पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठा पूर आल्यावर पाणी पुलावर येते. अनेक तिव्र उताराच्या जागा,साईड पटया खोल आहेत. कांही ठीकाणी रस्ता अरूंद आहे.त्यामुळे अनेकदा छोटे अपघांत होतात.
-रस्त्याच्या मंजूरीसाठी आमदारांचा पाठपुरावा
भोर ते अंबाडे हा २१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर अंबाडे पासून घाट रस्ता आहे. घाटात तिव्र उतार आणी वळणे आहेत. पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्यामुळे किरकोळ अपघात होतात. रस्ता वाहतूकीस बंद ठेवावा लागतो. मांढरदेव ते सुरूर या २५ किलो मीटरमध्ये छोटे पूल,मोऱ्या आहेत. संपूर्ण मार्गात असलेल्या सुमारे साडेचार हजार वृक्षांपैकी कांही वृक्ष काढले जाणार आहेत. रस्त्याच्या मंजूरीसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सुधारीत कामामुळे सुलभ दळण वळणाच्या सोईबरोबरच मार्गावरील गावांतून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या मार्गाने महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटक,प्रवासी पसंती देतात.