वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत


पुणे :  महापालिकेच्या माध्यमातून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत  केली. यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त राजेंद्र मुठे, विजय दहिभाते, अविनाश सकंपाळ, सुनिल इंदलकर, माधव जगताप शिवाजी लंके, अंजली साबणे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार कंपनी अधिकारी व अनेक पालिका अधिकारी उपस्थित होते.

महापालिका दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करणार आहे. महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी २८ ऑगस्टला मान्यता मिळाली होती. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.त्याबाबत मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. राज्यशासनाने नुकतीच महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
मोहोळ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा, तूर्त उपलब्ध असलेली जागा, कर्मचारी निवासाचे स्थलांतर आणि अतिक्रमण अशा विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चा केली. कमीत कमी कालावधीत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवणार आहे.