ई माहिती दूत उपक्रम प्रेरणादायक :  राज्यमंत्री  डॉ.प्राजक्त तनपुरे

अहमदनगर: कोरोना प्रतिबंधाच्या लॉकडाउन कालावधीमध्ये ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून जगभरातील स्पर्धा, प्रशिक्षणे, सेमिनार यांची माहिती ई-माहितीदूत या वेब पोर्टलच्या माध्यमातून देण्याचा शिक्षक डॉ अमोल

अहमदनगर: कोरोना प्रतिबंधाच्या लॉकडाउन कालावधीमध्ये ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून जगभरातील स्पर्धा, प्रशिक्षणे, सेमिनार यांची माहिती ई-माहितीदूत या वेब पोर्टलच्या माध्यमातून देण्याचा शिक्षक डॉ अमोल बागुल यांचा उपक्रम प्रेरणादायी व स्तुत्य आहे. या उपक्रमाला अजून जागतिक पातळीवर नेऊन व्याप्ती वाढवणे गरजेचे असून याचा फायदा निश्चितच लाखो गरजूंना होईल. स्वतःला जशी पारितोषिके मिळाली तशी इतरांना देखील मिळावीत ही बागूल यांची भावना मोलाची आहे,असे प्रतिपादन नगर विकास,ऊर्जा आदिवासी विभाग उच्च व तंत्रशिक्षण,आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

नगर येथील राष्ट्रपती पदकाने सन्मानित शिक्षक कलाकार डॉ. अमोल बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ई-माहिती दूत या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी तनपुरे बोलत होते. यावेळी तनपुरे यांच्या हस्ते ई-माहितीदूत या उपक्रमाच्या फेसबूक वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग,सॅनिटायझरचा वापर व इतर नियमांचे पालन करण्यात आले. तनपुरे यांच्या हस्ते बागुल यांचा सत्कार करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन येणाऱ्या विविध प्रकारच्या स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार,लाईव्ह यांचे दैनंदिन संकलन करून ई-माहिती दूत या वेब पोर्टलवर टाकले जाते. हे पोर्टल दर रोज साधारणतः दहा लाख लोकांपर्यंत पोहचते. गाव पातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत च्या विविध दैनंदिन प्रशिक्षण,स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे.यामध्ये विशेषत: शिक्षक, पालक, विद्यार्थी, कवी, लेखक,पत्रकार,डॉक्टर, वकील,सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी मान्यवर यांचा समावेश आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र व पारितोषिके तसेच अनेक बक्षिसांची योजना या उपक्रमांच्या माध्यमातून आयोजक देत असतात.