गुजरातमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाखाच्या बनावट नोटा जप्त

निगडी - ओटास्कीम येथे एक जण नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी २३ जून रोजी सापळा लावून आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये दराच्या ५० बनावट नोटा आढळून आल्या.

  पिंपरी: बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा निगडी पोलिसांनी पर्दाफाश केला. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कारवाई करत निगडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलीसांनी तब्बल १८ दिवस तपास करत निगडी तसेच पंढरपूर, सातारा, मुंबई, गुजरात येथे जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. गोरख दत्तात्रय पवार (वय ३०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय ३६, रा. नालासोपारा पुर्व, वसई, पालघर), राजू उर्पâ रणजीत सिंह फतुभा परमार (वय ३८, रा. काकरिया चौरा, ता. रानपूर, जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय २६), किरण कुमार कांतीलाल पटेल (वय ३८, दोघे रा. पालनपुर, जि. बनासकाठा, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  निगडी – ओटास्कीम येथे एक जण नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी २३ जून रोजी सापळा लावून आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये दराच्या ५० बनावट नोटा आढळून आल्या. तसेच त्याच्याकडील दुचाकीच्या डिकीत दोन हजाराच्या नोटांचे चार बंडल आढळून आले. या नोटांचे एका बँकेकडून परीक्षण केले असता सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोरखला अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ८६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

  आरोपी गोरखला या नोटा त्याचा सातारा जिल्ह्यातील मित्र विठ्ठल शेवाळे याने दिल्याचे तपासात पुढे आले. पोलीसांनी शेवाळे याला पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावात जेरबंद केले. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या. आरोपी शेवाळे याने नकली नोटा नालासोपारा येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून आणल्या असल्याचे सांगितले. पोलीस थेट जितेंद्र याच्या घरी गेले असता त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी १ जुलै रोजी आरोपी जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले.

  आरोपी जितेंद्र याने त्याचा गुजरात येथील साथीदार राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेत बनासकाठा जिल्ह्यातील पालनपुर येथे जाऊन परमार याला अटक केली. त्याच्याकडून १५ लाख ९३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. आरोपी परमार याने बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले.

  या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त केला. निगडी पोलिसांनी तब्बल १८ दिवस तपास करत आरोपींकडून दोन हजार रुपये दराच्या १ हजार ४०२, पाचशे रुपये दराच्या ९२९ अशा ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, कलर प्रिंटर, दुचाकी असा ३३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, कृष्णदेव खराडे, डॉ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, फौजदार आर. बी. बांबळे यांच्या पथकाने केली.