मलठणच्या शिंदेवाडी येथील खुनाचा तपास उघडकीस; ३ आरोपी ताब्यात

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील मलठण येथील गुन्ह्यातील उरळगाव हद्दीत सापडलेल्या मयत इसमाचा मृतदेह उरळगाव हद्दीत शीर नसलेल्या, धडाचे तुकडे केलेल्या स्थितीत आढळून आला होता.

  कवठे येमाई :  शिरूर तालुक्यातील मलठण येथील गुन्ह्यातील उरळगाव हद्दीत सापडलेल्या मयत इसमाचा मृतदेह उरळगाव हद्दीत शीर नसलेल्या, धडाचे तुकडे केलेल्या स्थितीत आढळून आला होता. सदरचा  गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील  अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मा मॅडम यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना  पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट  यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, पोलीस उप निरीक्षक  अमोल गोरे, सहा. फौजदार  दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, दत्तात्रय तांबे,  पोलीस नाईक जनार्दन शेळके, गुरु जाधव, राजु मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे, शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पोलिस नाईक संजय जाधव यांचे पथक तयार करून तपास कामी रवाना केले होते. 

सदर पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता मयत इसमाचे नाव बापु तावजी शिंदे, रा. मलठण ता. शिरूर जिल्हा पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नमूद पथकाने तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय बातमीच्या आधारे जालिंदर सुखदेव थोरात, वय ३२ वाघाळे गावडेवस्ती ता.शिरूर यास पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तर याप्रकरणी सुरेष रामदास खेडकर,वय २९,खंडाळा खेडकरवस्ती ता.शिरूर व लहानू तात्याबा थोरात वय २६ रा.वाघाळे ता.शिरूर यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. तर या प्रकरणातील चौथा आरोपी बाबाजी दत्तात्रय थोरात हा फरार आहे. आरोपींच्या वतीने किरण रासकर हे वकील काम पाहात आहेत. तर बापू तावजी शिंदे हे मिसिंग असल्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी रेश्मा बापू शिंदे यांनी दि. ७ ला पोलिसांत तक्रार दिली होती. तर दि. ९ ला या गुन्हयाचा उलगडा झाला.आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी शिंदे यांचे  हात, पाय, पोट, कुऱ्हाडीने तोडून मयत बॉडी भीमा नदीच्या पात्रात टाकून दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
अशाप्रकारे कोणताही सुगावा मागे नसताना निर्घृण खुनाचा गुन्हा पथकाने उघडकीस आणल्यामुळे पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलीस पथकास बक्षीस जाहीर केले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.