fraud

पुणे : गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून फायनान्स कंपनीच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी दिला आहे. ज्ञानेश्‍वर भगवान लोंढे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी स्मिता (वय ४४, रा. भोसरी) हिच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे

पुणे : गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून फायनान्स कंपनीच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी दिला आहे. ज्ञानेश्‍वर भगवान लोंढे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी स्मिता (वय ४४, रा. भोसरी) हिच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत कैलास तुकाराम सकपाळ (वय ३३, रा. भोसरी, मूळ. कुंबे शिवतर, ता. महाड, जि. रायगड) याने फिर्याद दिली आहे. ही घटना २२ ऑगस्ट २०१८ ते आतापर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मारूती वाडेकर यांनी बाजू मांडली. तर, फिर्यादी व ठेवीदारांच्या वतीने अॅड. विश्‍वास खराबे आणि अॅड. मंगेश खराबे यांनी काम पाहिले. वेदांत फायनान्स कंपनीत ३ लाख रुपयांची ठेव ३ वर्षासाठी ठेवल्यानंतर, त्या रक्कमेवर दरमहा चार हजार पाचशे रुपये व्याज देण्याचे अमिष दाखवून फिर्यादींना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीने गरज असल्याने परत रक्कम मागितली. त्यावेळी रक्कम देण्यास नकार देण्यात आला. याऊलट फिर्यादीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भोसरी पोलिसांनी ज्ञानेश्‍वर याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, फरार असलेल्या त्याच्या पत्नीविषयी तपास करण्यासाठी, रक्कमेविषयीचे रजिस्टर, पावत्या जप्त करण्यासाठी, तसेच, अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. मारूती वाडेकर आणि अॅड. विश्‍वास खराबे यांनी केली.