स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि विकासकामांची चौकशी व्हावी – गजानन चिंचवडे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कामातील निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. तसेच करारनाम्यातील अटी-शर्ती, मूळ प्रस्ताव, इस्टीमेट, शेड्युल नुसार झालेले नाहीत. मंजूर कामे मुदतीत आणि दर्जेदार झालेली नाहीत. निविदा प्रक्रिया न राबविता विविध कामांना मुदतवाढ देखील देण्यात आली आहे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेत होणारी अनियमितता आणि विकासकामांमध्ये झालेले आर्थिक घोटाळे व कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत चिंचवडे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कामातील निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. तसेच करारनाम्यातील अटी-शर्ती, मूळ प्रस्ताव, इस्टीमेट, शेड्युल नुसार झालेले नाहीत. मंजूर कामे मुदतीत आणि दर्जेदार झालेली नाहीत. निविदा प्रक्रिया न राबविता विविध कामांना मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. विकासकामांची कुठे आवश्यकता आहे किंवा नाही यांची तपासणी न करता कामे मंजूर करण्यात आली आहेत. मागील तीन वर्षात हे प्रकार सर्रास घडत आहेत.

या सर्व प्रकारांची माध्यमांनी वेळोवेळी दखल घेतली आहे. शहरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये अनेक बातम्या, लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत. तरी देखील कामकाजात सुधारणा झालेली नाही. नागरिकांच्या कररूपी पैशातून विकासकामे होत आहेत. पारदर्शक कारभार होण्यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्यावतीने वरील प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.