शिक्रापूर चाकण रस्त्यावर आढळला इसमाचा मृतदेह

सोशल मिडीयामुळे लागला मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध

शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथील शिक्रापूर चाकण रस्ताचे कडेला एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.                    

शिक्रापूर ता. शिरूर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने वाहन चालक दिनेश शेळके हे सकाळच्या सुमारास जात असताना त्यांना रस्त्याचे कडेला लोकांची गर्दी दिसली शेळके यांनी थांबून पाहणी केली असता एका पुरुषाचा मृतदेह तेथे आढळून आला, त्यांनतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास दगडे, पोलीस शिपाई अविनाश पठारे यांनी त्या ठिकाणी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे हलविला, यावेळी सदर इसमाच्या खिशात फक्त एक फोटो कार्ड मिळून आले मात्र इसमाबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी सोशल मिडीया तसेच हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या तलाश वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सदर इसमाचे फोटो व माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करून नागरिकांना मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन केले, त्यांनतर दुपारच्या दरम्यान सदर मृत इसमाच्या नातेवाइकांनी सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करून शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता सदर मृतदेह बबन राजगुरू रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे या इसमाचा असल्याचे निष्पन्न झाले, त्यांनतर सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, याबाबत दिनेश बाळासाहेब शेळके रा. मांढरेवस्ती शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.