आदेशांचे पालन करून वेगवेगळ्या पर्यायाने शिक्षण सुरु ठेवणे गरजेचे : अविनाश क्षीरसागर

    पाबळ : जीवन खूप सुंदर आहे. कष्टाशिवाय ते उभं राहत नाही. म्हणून अंतिम ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रचंड कष्ट करा, काळजी घ्या, यश तुम्हाला हुलकावणी देणार नाही. कोरोनाची परिस्थिती जरी खडतर असली तरी त्यातून मार्ग काढून शासनाच्या विविध आदेशांचे पालन करून आपणास शिक्षण वेगवेगळ्या पर्यायाने चालू ठेवणे गरजेचे आहे, असे प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी सांगितले.
    शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीने शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आज श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे १० वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे  मान्यवरांच्या हस्ते गुलाब-पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
    कार्यक्रमाला उपसरपंच राजेंद्र वाघोले, सुदाम पिंगळे, तुकाराम ताम्हणे, रोहिदास चौधरी, आनंदा गावडे, संदीप गवारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, पाबळचे सरपंच मारुती शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.