संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला ; पुण्यात होणार भेट

भाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे.

    पुणे: मागील काही दिवसापासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पुण्यात आज (सोमवारी) दुपारी एक वाजता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे.
    मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)संदर्भात शिवराज्य अभिषेकदिनी संभाजीराजे छत्रपती १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का? पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.