जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे रोटी घाटात वरूणराजाने केले जंगी स्वागत

    पाटस : जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा यंदा फुलांनी सजावट केलेल्या शिवशाही बसमधून आज पालखी मार्गावरू पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा पाटस, रोटीच्या नागमोडी वळणाच्या घाटातून हिरव्यागार डोंगरातून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या घाटात आल्यावर वरूणराजाने या पालखीचे स्वागत केले.

    रिमझिम पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव झाला. डोळ्यात पारणे फिटेल असे हे दृश्य होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त असल्याने नागरिकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही. अनेकांनी लांबूनच हात जोडून पालखीचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या लाखो भक्तांच्या सोबत निघणारा पालखी सोहळा मागील वर्षापासून सजावट केलेल्या बसमधून पंढरपुरला जात आहे.

    यंदाही कोरोनाचे सावट असल्याने फुलांनी सजावट केलेल्या शिवशाही बसमधून संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सोमवारी (दि.19) दौंड तालुक्यातून पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. या पालखी सोहळा पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरून पाटस येथील टोल नाक्यावर आगमन होताच अनेकांनी थांबूनच धावत्या बसमधील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. ही पालखी पावणे बाराच्या सुमारास रोटीच्या नागमोडी वळणाच्या आणि हिरव्यागार डोंगर असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रोटी घाटाच्या पायथ्याशी आगमन होताच वरूणाराजीने हजेरी लावली.

    रिमझिम पावसाच्या सरीचा वर्षाव घाटात या पालखीवर झाला. जणू काय वरूणराजाने या घाटात या पालखीचे जंगी स्वागत केले. हे दृश्य पाहण्याजोगे होते जणू काय डोळ्याचे पारणे फिटेल असे हे दृश्य होते. पावसाच्या सरी झेलत या पालखीचा ताफा रोटीच्या नागमोडी वळणाचा टप्पा पार करीत रोटीच्या घाटाच्या वरती जेथे दरवर्षी पालखीची आरती होत असते तेथे जाऊन थांबली.

    यावेळी रोटी घाटावर संत तुकाराम महाराज पालखीचा दहा ते पंधरा मिनिटे विसावा झाला. येथे संत तुकाराम महाराज यांची आरती घेतली गेली. माऊली तुकाराम यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. आरती घेतल्यानंतर ही पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पालखी सोबत असलेली लाखो वारकरी भक्तांची रांग, टाळांचा मृदुगांचा गजर, घाटात फुगड्यांचा खेळ, भक्तीमय वातारवणात दंग झालेले वारकरी भक्त हे दृश्य मात्र पाहावयास मिळाले नाही.