पाणी पिण्याचा बहाणा करत ज्येष्ठ महिलांचे दागिने लंपास

    शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंगळवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाणी पिण्याच्या बहाणा केला. तसेच घरात प्रवेश करून दोन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    कोरेगाव भीमा येथील सुलोचना शिंदे व वेणूबाई कटके या दोन ज्येष्ठ महिला घरात असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात युवक दुचाकीवरून सदर ठिकाणी आले. त्यांनी महिलेच्या नातवाचे नाव घेत घरात प्रवेश करून पाणी मागितले. यावेळी शिंदे या पाणी आणण्यासाठी आतील घरात जात असताना त्या तरुणांनी सुलोचना शिंदे व वेणूबाई कटके या दोन्ही महिलांच्या गळ्यातील सुमारे ८६ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने जबरदस्तीने ओढून घेत घरून पोबारा केला.

    याबाबत सुलोचना पंढरी शिंदे (वय ६८ वर्षे रा. सारिका हॉटेलजवळ कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात तरुणांवर गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहे.