५५ आमदारांचा जसा मुख्यमंत्री झाला तसा ५० नगरसेवकांचा महापौर होईल- खासदार संजय राऊत

महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार, जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत

  पिंपरी: आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) आकुर्डीत तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा झाला. त्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवायचा या जिद्दीने शिवसैनिक कामाला लागलेत. आगामी निवडणुकीत ५० नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याचे संकेत देत ५५ आमदारांचा जसा मुख्यमंत्री झाला. तसा ५० नगरसेवकांचा महापौर होईल, अशी रणनितीही त्यांनी स्पष्ट केली.
  ”भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. यापेक्षा जास्त वाढताना दिसत आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड हाच मुद्दा घेऊन शिवसेना महापालिकेची आगामी निवडणूक लढविणार आहे. महापालिका कशी चालवायची, शहर कसे ठेवायचे, लोकांना सुरक्षा कशी द्यायची हे आम्ही दाखवून देणार आहोत. मुंबई, ठाणे, औरंगाबादमधील लोकांना शिवसेना आधार वाटते. तसेच पिंपरी-चिंचवडमधील लोकांना शिवसेना तुमची आहे आणि तुम्ही शिवसेनेचे आहेत, हे दाखवून दिले जाईल. ताकद ही सुज असते. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यात अर्धे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मूळचे कुठे आहेत ? आता हे अर्धे उठून राष्ट्रवादीत जातील. इथे ओरिजनल पक्ष शिवसेनाच आहे. बेडूक उड्यातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर होणार आहे का ?. इकडून तिकडे जाणारे स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. त्यांना महापालिका आणि शहराचे काय पडलेले नाही” असेही ते म्हणाले.

  …तरच महापालिका निवडणुकीत आघाडी !

  महाराष्ट्रात नक्कीच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही विचार करु. आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही. सन्मानाने जागा वाटपबाबत नक्की चर्चा केली जाईल, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.

  पिंपरी-चिंचवड शहरात पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. याउलट जास्त वाढताना दिसत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त ही सगळी ठेकेदारीची रिंग आहे. शहरातील आमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतलेत. महापालिकेत जनतेच्या पैशांची घाणेरड्या पद्धतीने लूट होत असल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. खासदार राऊत म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेत जनतेच्या पैशांची घाणेरड्या पद्धतीने लूट होत आहे. मुंबईत बसलेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. सत्य सहन होत नाही. याला राजकारण म्हणत नाही. महापालिकेतील भ्रष्टाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. स्मार्ट सिटीतील भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून सुलभा उबाळे यांनी हा प्रकार उघडकीला आणला. हे गंभीर प्रकरण आहे. इथे ईडी किंवा सीबीआय का जात नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे”.

  ”स्मार्ट सिटीची कामे घेणा-या कंपनीत कोणाचे कुटुंबीय संचालक आहेत, याबाबतची सगळी कागदपत्रे ईडीला पाठविणार आहोत. असे तपास हल्ली राज्य सरकार करत नाही. ईडी करते. ईडीकडे माहिती नसेल तर आम्ही पाठवून देवू. महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार, जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत”, असेही राऊत म्हणाले.