कळमोडी धरण १०० टक्के ‘फुल्ल’ ! भीमाशंकर खोऱ्यात संततधारेने भातशेतीचे नुकसान

    राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण १०० टक्के भरले असून, धरणातून आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. भीमाशंकर परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे १.५ टीएमसी असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, आरळा नदीतून चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    काळमोडी धरण आठही सांडव्याद्वारे रात्रीच्या सुमारास ६९७९ क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले. पहाटे पावसाचा थोडा जोर कमी झाल्याने ३००० क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. कळमोडी धरण परिसरात पडत असणाऱ्या पावसाने मागील २४ तासांत ९४ मिलिमिटर नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

    धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. चासकमान धरण परिसरात मागील २४ तासांत ६८ मिलिमीटर नोंद करण्यात आली आहे. तसेच भीमाशंकर परिसरात ३१३ मि.मी पाऊस झाला आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ३.०८ मि.मी वाढ झाली आहे. पाणीसाठ्यात १ टीएमसी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस अद्यापही सुरू आहे.

    बुधवारी (दि. २१) रोजी रात्री मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भोरगिरी ते डेहणे परिसरातील अनेक गावात भात शेतीचे बांध वाहून गेले. तसेच नवीनच आवणी केलेली भात रोपे गाडली गेली आहेत. नायफड येथे माती बंधारा फुटला असून जावळेवाडी मंदोशी येथील चार वर्षांपूर्वी बांधलेला पूल वाहून गेला आहे. या भागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना निवेदन दिले.

    पश्चिम भागात उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी भेट दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खेड तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला असून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांचे पथक २४ तास लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी मदतीसाठी ०२१३५२२२०४० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महसूल विभागाच्या सूत्रांनी केले आहे.