कर्मयोगी सहकारी चौदा लाख मे.टन ऊसाचे गाळप करणार

इंदापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात १४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात उपपदार्थ निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे,अशी माहिती कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी दिली.कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२०-२१ चा ३१ वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजनाचा समारंभ रविवारी हर्षवर्धन पाटील,कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

-७५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या गळीत हंगामात कारखान्याने १४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतुक यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हजर झाली आहे. या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन १ कोटी ३० लाख ब.लि., सहवीज निर्मिती ३ कोटी युनिटस, बायोगॅस १२ लाख घनमीटर,सेंद्रीय खत ४ लाख बॅग, कंपोष्ट खत २४ हजार मे.टन व जैविक खते, औषधे २० हजार लिटर एवढे उत्पादन पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामात कर्मयोगी ७५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार आहे.उत्पादित इथेनॉल ऑईल कंपन्यांना विक्री करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास आजूबाजूच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर दिला जाईल.दर पंधरवड्याला ऊसाची बीले व ऊस तोडणी वाहतुकदारांची बीले संबंधित सभासदांच्या व वाहतुकदारांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार,तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करुन हा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा,भास्कर गुरगुडे,विष्णू मोरे,हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग,अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड,राहूल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले,पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले,जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार,व सर्व खात्यांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.