शिरूरचा कृषी बाजार रात्री ८ ते १२ पर्यंत चालू ठेवा ;  बळीराजा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांची मागणी

कवठे येमाई: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या पहाटेच्या सुमारास शेती मालाची विक्री होत आहे.

कवठे येमाई: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या पहाटेच्या सुमारास शेती मालाची विक्री होत आहे. शेतकऱयांच्या दृष्टीने ही वेळ अत्यंत गैरसोयीची असल्याने रात्री ८ ते १२ अशी कृषी माल विक्री बाजाराची वेळ तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण भारत शिरूर व शेतकऱयांनी केली आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरुर या ठिकाणी बाजाराची वेळ बदलल्या बाबत अनेक शेतकऱ्यांनी या संघटनांकडे तक्रार केली होती. रात्री ८ ते १२ अशी कृषी माल विक्री बाजाराची वेळ असल्यास पुणे, मुंबई, मोशी व इतर ठिकाणांवरून व्यापारी माल घेण्यासाठी उपस्थित असतात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालाला जास्त प्रमाणात भाव मिळतो असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. आताची बाजारची वेळ पहाटे असल्याने बाहेरुन व्यापारी कमी येतात. त्यामुळे स्थानिक व्यापारी कमी भावात मालाची मागणी करतात. त्यामध्ये शेतकर्‍यांचे मोठेच नुकसान होते. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर गुरुवारी (दि.२९) रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरुर या ठिकाणी वरील संघटनातील पदाधिकाऱयांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी शेतीमाल विक्रीस घेऊन आलेल्या बहुसंख्य शेतकर्‍यांनी संध्या ७ ते रात्री १२ पर्यंत कृषी माल विक्री बाजार चालू राहिला पाहिजे,अशी मागणी केली. आजच शेतकऱयांच्या या मागणी संदर्भात शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण भारतचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता शेठ मुसळे, शिरूर तालुका कार्याध्यक्ष बाबाजी रासकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे व शेतकरी उपस्थित होते.

२००९ पासून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटे शेतीमाल विक्री बाजार भरत आहे. तालुक्याच्या अनेक भागातून शेतमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱयांच्या दृष्टीने ही वेळ अडचणीची ठरत असेल तर शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून शेतकऱयांच्या हिताचा निर्णय तत्काळ घेऊन दिवाळीपूर्वीच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

-शंकर जांभळकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर