जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांसह वर्ग व्हाव्यात; शिक्षक संघाचे शरद पवारांना साकडे

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे, पनवेल व बारामती नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शिक्षकांसह वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी शनिवारी गोविंदबाग बारामती येथे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली.

  सन २०१५-१६ पासून पुणे,पनवेल महानगरपालिका व बारामती नगरपालिकेत हद्दवाढ झाल्याने नवीन गावे समाविष्ठ करण्यात आली.तेथील ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासकीय व महसुली कामकाज महानगरपालिका व नगरपालिका प्रशासना मार्फत सुरु आहे.परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांचे वर्गीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.

  काही ठिकाणी ग्राम विकास विभागाच्या २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयामुळे वर्गीकरण प्रक्रियेस विलंब होत आहे.तर काही ठिकाणी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमचा संदर्भ देऊन शिक्षक वर्गीकरणास असहमती दर्शवली जात आहे.त्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.यासर्व परिस्थितीतून मार्ग निघावा याकरीता शिक्षक संघाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घातले आहे.

  ग्राम विकास विभागाच्या दिनांक २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ गावातील शाळा वर्ग करताना जिल्ह्यातील शिक्षकांकडून विकल्प भरून घेऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक वर्ग करावेत असे सूचित केले आहे.या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्याची प्रक्रिया ढवळून निघेल व शिक्षक वर्गीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट होईल.तसेच अनेक महिला व दिव्यांग शिक्षकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

  शिक्षक वर्गीकरण करताना सद्ध्या शाळेवर कार्यरत शिक्षकांकडून विकल्प भरून घ्यावेत.ज्यांचा वर्गीकरणास होकार आहे, त्यांना वर्ग करण्यात यावे व ज्यांचा वर्गीकरणास नकार आहे , त्यांच्या ऐवजी सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वेच्छेने वर्ग करण्यात यावे.सदरची दुरुस्ती २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयात व्हावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली.

  सदर शासन निर्णयात दुरुस्ती होण्यासाठी आपले निवेदन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे माझ्या शिफारशीसह पाठवतो, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. यावेळी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड, अध्यक्ष हनुमंत शिंदे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते.