खाकीचे स्वप्न धूसर; ३ वर्षांपासून अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत

एमपीएससी, रेल्वे परीक्षा झाली, पोलिस भरती का नाही? महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात एमपीएससी परीक्षा घेतली जाते, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात, रेल्वे व इतर केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. निवडणुका घेतल्या जातात. त्यामुळे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    पिंपरी: कोरोना संकटामुळे अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच असताना तीन वर्षांत पोलिस भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीसाठी सराव करीत असलेल्या तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे. बेरोजगार तरुणांमध्ये या धोरणाबाबत तीव्र पडसाद उमटत आहे.

    पुणे जिल्ह्यासह राज्यात २०१८ नंतर एकाही जिल्ह्यात पोलिस भरती झालेली नाही. पोलिस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांकडून घोषणा खूप झाल्यात; परंतु अद्याप पोलिस भरतीची तारीख जाहीर झाली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलिस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांमध्ये अर्ज भरून घेण्यात आले ; परंतु त्याचीही पुढे कोणतीही प्रक्रिया राबविली गेली नाही. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. बहुसंख्य मुले कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आहेत. ही मुले शहराच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात, क्लास लावतात, पुस्तके व खानावळीचा होणारा मोठा खर्च त्यांना पेलवत नाही. पोलिस भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्याचे वय वाढले आहे. विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. या तरुणांचे पालकसुद्धा पूर्ण खचून गेले आहेत.

    साडेबारा हजार जागांवर भरतीची प्रतीक्षा
    राज्यात एकाच वेळी जाहीर केलेल्या १२ हजार ५२८ पदांची भरती प्रक्रिया राबविली जावी. ही भरती करताना कोरोनामुळे ज्यांची वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांना सवलत द्यावी, अशीही मागणी होत आहे. पोलिस भरतीकडे ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूरवर्ग डोळे लावून वाट बघतोय. कोरोनामुळे अनेक बेरोजगार झाले, तर संपूर्ण मध्यमवर्ग हलाखीच्या स्थितीतून जात आहे. तरुणांना रोजगाराची, तर सरकारला पोलिस शिपायाच्या जागा भरणे निकडीचे झाले आहे. तीन वर्षांपासून भरती न झाल्याने अनेकांनी वयोमर्यादा ओलांडली, तर काहींनी भरतीचा नाद सोडला. भरतीमागे लागून उमेदीची वर्षे वाया घालवल्याची भावना तरुणांमध्ये आहे.
    एमपीएससी, रेल्वे परीक्षा झाली, पोलिस भरती का नाही? महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात एमपीएससी परीक्षा घेतली जाते, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात, रेल्वे व इतर केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. निवडणुका घेतल्या जातात. त्यामुळे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.