कोरोनामुळे धामणीच्या खंडोबा मंदिरात शुकशुकाट

यंदा पालखीची मिरवणूक रद्द

मंचर :  सोमवारी दिवसभर अमावस्या असल्याने भर सोमवती अमावस्येचा योग होता.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबा देवाच्या पंचधातुच्या मुखवट्याची पालखीची मिरवणूक रद्द करण्यात आली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

धामणी येथील खंडोबा देवस्थान खेड,आंबेगांव, जुन्नर,शिरुर, पारनेर,श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य गांवातील भाविकांचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येला देवाच्या दर्शनासाठी आवर्जुन येत असतात.भर सोमवती अमावस्या असल्याने सकाळी वाघे व वीर मंडळीनी खंडोबाचा मुखवटा मंदिरातून भगताच्या विहीरीवर आणला.त्याठिकाणी नित्य सेवेकरी व सोमवतीच्या मानकऱ्यांच्या हस्ते देवाच्या मुखवट्याला सोमवती स्नान घालण्यात आले.त्यानंतर धार्मिक विधी व आरती करण्यात आली. देवाचा मुखवटा दुचाकीवर म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात ठेवून मंदिर बंद करण्यात आल्याचे भगत मंडळीनी सांगितले. सोमवती स्नानाच्या वेळी सोमवतीचे मानकरी नरके(तळेगांव ढमढेरे),राजगुरु (अवसरी खुर्द), गावडे (गावडेवाडी),पडवळ व आवटे (महाळुंगे पडवळ) येथील प्रत्येकी एक प्रतिनिधीसह दादाभाऊ भगत,धोंडीबा भगत, प्रभाकर भगत, राजेश भगत, सुभाष तांबे.शांताराम भगत, ज्ञानेश्वर जाधव (वाघे),सिताराम जाधव,दिनेश जाधव (वाघे, नामदेव पवार,सुरेश पवार (वीर) असे एकूण पंधरा जणाच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून सोमवती स्नान सोहळा पार पडला. मंदिर बंद असल्याने भाविकांनी व ग्रामस्थांनी मंदिरात जाण्याचे टाळले.