‘पोलिसांनी’मारले, ‘आयुक्तांनी’ झिडकारले आता न्याय कुणाकडे मागायचा; ज्येष्ठ नागरिक दांपत्याची न्यायासाठी वणवण

पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत तक्रार करण्यासाठी फुके दाम्पत्य शनिवारी २० पोलीस आयुक्‍तालयात आले. मात्र स्वागत कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्‍तांची भेट देण्यास नकार दिला.

    पिंपरी: पोलिसांनी शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला पोलिस आयुक्तांकडून ही न्याय मिळाला नाही. पोलिसांनी केलेल्या मारहाणमध्ये पतीच्या डोळ्याला तर पत्नीच्या कानाला गंभीर दुखापत झाली. याची तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला आयुक्तालयाच्या दारातूनच पोलिसांनी परत पाठवले.

    यामुळे या वृद्ध दाम्पत्याची घोर निराशा झाली असून नागरिकांना भेटण्यासाठी ठरवलेल्या वेळेत तरी किमान आयुक्त भेटतील का, असा सवाल या दाम्पत्याने उपस्थित केला आहे. कुमार लक्ष्मण फुके आणि अलका कुमार फुके (दोघेही रा. भोसरी) अशी दुखापत झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. फुके यांची अदखलपात्र तक्रार पोलिसांनी घेतली आहे.

    याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी स्पाइन रोड, मोशी येथे राहणाऱ्या फुके यांच्या मुलीचे तिच्या पतीशी भांडण झाले. तुमच्या मुलीला घेऊन जा, असे जावई वारंवार सांगत होता. मात्र ‘माझा आणि माझ्या मुलीचा आयुष्यभर सांभाळ करणार का’, असा प्रश्‍न मुलगी फुके यांना विचारत होती. जावयाने त्यांना पोलीस ठाण्यासमोरील सर्कलजवळ बोलावले. त्यामुळे फुके दाम्पत्य तिथे गेले.

    तिथे गेल्यावर सासरे फुके आणि जावयामध्ये रस्त्यावरच भांडण झाले. समोर असलेल्या पोलिसांनी जावई आणि फुके दाम्पत्याला भांडण मिटविण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे अश्‍लिल शिवीगाळ करीत पोलिसांनी फुके दाम्पत्याला मारहाण केली. या मारहाणीत कुमार फुके यांच्या डोळ्याला तर अलका यांच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाली.

    पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत तक्रार करण्यासाठी फुके दाम्पत्य शनिवारी २० पोलीस आयुक्‍तालयात आले. मात्र स्वागत कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्‍तांची भेट देण्यास नकार दिला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास त्यांना सांगण्यात आले. ज्यांनी मारहाण केली त्यांच्याकडेच तक्रार कशी करणार, असा सवाल फुके दाम्पत्याने केला. त्यानंतर प्रथम सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात जा, तिथे निवारण न झाल्यास उपायुक्त कार्यालयात जा, तिथेही निवारण न झाल्यास मग आयुक्त कार्यालयात याच असाही सल्ला आयुक्‍तालयातील कर्मचाऱ्यांनी दाम्पत्याला दिला.