श्रीरामपूरच्या आत्मनिर्भर युवा शेतकऱ्यांचे ‘किसान कनेक्ट’

गणेशोत्सवात पुरवित आहेत ऑनलाईन भाजीपाला
अहमदनगर : लाॅकडाऊनच्या समस्येवर मात करीत अहमदनगर व पुणे जिल्ह्य़ातील दहा ते बारा तरुण शेतकऱ्यांनी एकत्र  येऊन सुरू केलेल्या ‘किसान कनेक्ट’ या घरपोच व ताज्या, पोषक भाजीपाला व फळे विक्री मंचाच्या माध्यमातून मुंबई व पुणे महानगर क्षेत्रात स्वत:ची बाजारपेठ निर्माण केली आहे. या गणेशोत्सवाच्या  काळात ग्राहकांना ताज्या व सणासुदीला लागणार्या भाज्या व विशिष्ट फळे ताज्या आणि माफक किंमतीत घरपोच पोहोचविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी निवडक भाजीपाला व फळांच्या खास बास्केटस्ा पुरविण्यात येत आहेत.
कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात भाजीपाला व फळे खरेदीविक्रीमध्ये मुंबई व पुण्यात अडचणी निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून अहमदनगर जिल्ह्य़ातील राहता व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील दहा ते बारा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची भाजीपाला व फळे पुरवठा करणारी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याचे ठरविले व त्यातूनच ‘किसान कनेक्ट’ या ‘शेतकरी उत्पादन कंपनी’ची निर्मिती झाली. शेतकर्यांनी या माध्यमातून मुंबई, पुणे, नाशिक व अहमदनगर याठिकाणी ‘शेतातून थेट घरपोच’ या तत्वावर भाजीपाला व फळे विक्री सुरू केली.

-अनेक ग्राहक जोडण्यात शेतकरी यशस्वी
अहमदनगर जिल्ह्य़ातील राहाता व जुन्नर  तालुक्यामधील मनिष मोरे, उर्मिला हर्दे, भाऊसाहेब आहेर, अरुण मुथे, तारकचंद कडू, श्रीकांत ढोकचौळे, सुमित लांडे या तरुण शेतकऱ्यांनी किसान कनेक्टची पायाभरणी केली आहे आणि अल्पावधीतच आजमितीला सुमारे पाचशे शेतकरी या चळवळीला जोडले गेले आहेत. गेल्या चार महिन्यांत फळ आणि भाजीपाल्याच्या ८० हजार बॉक्सची विक्री करण्यात आली असून त्याची उलाढाल ३ कोटींच्या आसपास आहे.शून्यातून नवी बाजारपेठ निर्माण करीत या प्रयोगशील व आधुनिक शेतकर्यांनी स्वतःचा ग्राहकवर्ग मुंबई व पुण्यात तयार केला आहे. ताजा आणि स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची संख्या वाढत असून समाजमाध्यमातूनही अनेक ग्राहक जोडण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत,अशी माहिती श्रीकांत ढोकचौळे या शेतकऱ्याने दिली.