कोल्हे – पाटील वाद महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार! ; खेड बाह्यवळण उड्डाणपुलाच्या उदघाटनावरून वाद

खेड नारायणगाव उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला शिवाजीराव पाटील यांना निमंत्रण नव्हते. याची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी शिवसैनिकाच्यासह जाऊन नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर उदघाटन केले. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी," या पोरकटपणा या वयात शोभत नाही. "अशी टिका करत "उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री आहेत."असे विधान केले.

    संपत मोरे , पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सूरु झालेल्या संघर्षावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या वादाची चर्चा तिन्ही पक्षातील नेत्यांच्यात आहे, मात्र उघडपणे कोणी काही बोलत नाही असे चित्र आहे. खेड बाह्यवळण उड्डाणपुलाच्या उदघाटनावरून हा वाद सुरु झाला या वादाचे पडसाद शिरूरमध्ये उमटले आहेत.

    खेड नारायणगाव उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला शिवाजीराव पाटील यांना निमंत्रण नव्हते. याची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी शिवसैनिकाच्यासह जाऊन नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर उदघाटन केले. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी,” या पोरकटपणा या वयात शोभत नाही. “अशी टिका करत “उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री आहेत.”असे विधान केले.

    कोल्हे यांच्या या विधानाचा समाचार घेत ,”तुम्ही जी सत्तेची फळं चाखताय, तुमच्या नेत्यांना जी मंत्रीपद मिळाली, ती शिवसेनेमुळंच मिळाली आहेत असं मी सुद्धा म्हणू शकतो. पण मी तस म्हणणार नाही . कारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या संगनमताने हे सरकार चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जास्त आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला.”अशी टिका शिवाजीराव पाटील यांनी केली.

    कोल्हे आणि पाटील यांच्यात सलग तीन दिवस आरोप प्रत्यारोप सुरु होते, महाविकास आघाडीतील खासदार आणि माजी खासदार यांच्यात कलगीतुरा सुरु असताना राज्यस्तरावरचे नेते मात्र यावर काहीही प्रतिक्रिया देतांना दिसले नाहीत. हा स्थानिक वाद समजून त्यावर प्रतिक्रिया देणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने टाळले आहे.महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल सातत्याने चर्चा सुरु असताना आघाडीच्या दोन नेत्यांत सुरु झालेला कलगीतुरा आघाडीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरला आहे.