कुरकुंभ : विषारी सांडपाणी शेतात ; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे गाजर

कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड जि.पुणे ) येथील औद्योगिक वसाहत मधील सम्राट पेपर मिल  या कंपनीचे दूषित सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार उघड झाला होता. या कंपनीच्या सांडपाण्याची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी शनिवार ( ता. ०८ ) रोजी घडनास्थळी पाहणी करून या दूषित सांडपाण्याचे नमुने जमा केले आहेत. 

यावेळी प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसात कारवाई करतो, असे  उपस्थितांना तोंडी आश्वासन दिले आहे. दरम्यान नोव्हेंबर २०१९  मध्ये सम्राट पेपर मिल ही कंपनी  बेकायदेशीर दूषित सांडपाणी तलावात पाणी सोडून पर्यावरणाला गंभीर इजा केली  होती. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण विभागाने कारणे दाखवा नोटीस बाजविण्यात आली होते. यावेळी सम्राट कंपनीने  मर्यादीपेक्षा अधिक पाणी वापर केला असल्याने पाणी व वीज पुरवठा खंडित का करू नये या संदर्भात योग्य खुलासा करण्यासाठी कंपनीला  फेब्रुवारी २०२० मध्ये निर्देश देण्यात आले होते.

प्रदूषण नियंत्रण विभागाच्या  डोळ्यासमोर प्रदूषण होत असतानाही अधिकारी मूग गिळून गप्प का बसत आहेत,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  यावेळी संबंधित प्रदूषणाबाबत विचारणा केली असता, लेखी तक्रार प्राप्त होईपर्यंत ऍक्शन मोड वर येत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे  नागरिकांना दिली जात आहेत. तसेच जलप्रदूषणाचे नमुने जमा करत असताना संबंधित अधिकारी नियम धाब्यावर बसवून मिळेल त्या छोट्या ड्रम मध्ये बेकायदेशीर नमुने जमा  करत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत.

तसेच जलप्रदूषणा संदर्भात अनेक लेखी तक्रारी होऊनही अधिकारी कात टाकण्यास तयार नाहीत.  कुरकुंभ परिसरात  वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत परंतु वायू प्रदूषणाबाबत एकाही कंपनीवर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज अखेर  कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अनेक कंपन्यांच्या प्रदूषणवर संबंधित प्रदूषण विभागाचे अधिकारी कागदी घोडे नाचवत असल्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सद्याच्या कामाची पद्धत बदलून पारदर्शक कारभार करण्याचे सूचना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

“कुरकुंभ परिसरातील शेतकऱ्यांना औद्योगिक प्रदूषणाचा फटका बसत आहे. आगामी काळात औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण बंद करण्यासंदर्भात प्रयत्नशील राहणार आहे. सम्राट पेपर मिल कंपनी च्या जलप्रदूषणाच्या घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच या घडलेल्या प्रकरणाची कल्पना खासदार सुप्रिया सुळे यांना देणार आहे.”

-रमेश थोरात  ;  (माजी आमदार व पुणे जिल्हा बँक, अध्यक्ष)