कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत; ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची तक्रार

१ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील एकूण मयत रुग्णांची संख्या २ हजार १८ व शहरा बाहेरील (परंतु शहरात उपचार घेत असलेले) ८३९ इतकी जाहीर करण्यात आली. असे एकूण २ हजार ८५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महापालिकेच्या वतीने शहर हद्दीतील व शहरा बाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेले कोरोनाने बाधित रुग्ण, मयत व बरे झालेल्या रुग्णांची माहिती दररोज जाहीर करण्यात येते. परंतु कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत असल्याली आकडेवारी व प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती यात मोठी तफावत असल्याची तक्रार ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.

    याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रकात सीमा सावळे यांनी म्हटले आहे की, १ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील एकूण मयत रुग्णांची संख्या २ हजार १८ व शहरा बाहेरील (परंतु शहरात उपचार घेत असलेले) ८३९ इतकी जाहीर करण्यात आली. असे एकूण २ हजार ८५१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दि. १ एप्रिल रोजी एकूण १७ रुग्ण मयत झाले असल्याचे मनपाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. २३ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील एकूण मयत रुग्णांची संख्या २ हजार ५५१ व शहरा बाहेरील (परंतु शहरात उपचार घेत असलेले) १ हजार १४१ इतकी जाहीर करण्यात आली. असे एकूण ३ हजार ६९२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दि. २३ एप्रिल रोजी एकूण ७१ रुग्ण मयत झाले असल्याचे मनपाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले.

    प्रत्यक्षात मात्र एप्रिल महिन्यात १ ते २३ तारखे दरम्यान महापालिकेच्या वतीने कोरोनामुळे मृत झालेल्या ७४३ अंत्यसंस्कार भाटनगर स्मशानात करण्यात आले. त्याखालोखाल भोसरी स्मशान ६०१, निगडी स्मशान ३५८ आणि सांगवी ११८ असे एकूण १८२० कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील आणि बाहेरगावच्या सर्व मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार हे अंत्यंसंस्कार झाले. स्मशानातील रजिस्टर वहित कोरोना मृतांपुढे तसा शेरा असतो. त्याची पडताळणी केली असता चारही प्रमुख स्मशानांतून १८२० मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मी स्वत: उपरोक्त स्मशानभूमीचे ठिकाणी जाऊन सदरची माहिती प्राप्त केली आहे. वरील आकडेवारी व मनपाने प्रसिद्ध केल्लेल्या आकडेवारीचा विचार करता असे स्पष्टपणे दिसून येते की, मृत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे.

    मनपाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार १ ते २३ एप्रिल या कालावधीत एकूण ८४१ (३६९२-२८५१) कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे मनपाने जाहीर केले परंतु प्रत्यक्षात १ हजार ८२० मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाल्याची नोंद उपरोक्त उल्लेखित स्मशान भूमींमध्ये आहे. म्हणजेच तब्बल ९७९ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू होऊन मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाला असतानाही सदर मयतांची नोंद लपविण्यात आली आहे हे स्पष्ट होते. सदर बाब अत्यंत गंभीर असल्याने त्याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होत असलेले मृत्यू नागरिकांसमोर सत्यतेने मांडल्यास या व्हायरसची भीषणता लोकांच्या लक्षात येईल. त्यामुळे नागरिकांना अधिक सावधानतेने वागण्याची आवश्यकता असल्याची जाणीव होऊ शकेल. तसेच वाढत्या मृतांच्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत अधिक गांभीर्य निर्माण होईल. मला निश्चितपणे याची जाणीव आहे की, कोरोना व्हायरससोबत लढण्यास आपण सर्व शर्थीचे प्रयत्न करत आहात. परंतु मृतांची आकडेवारीची लपवालपवी केल्याने आरोग्य यंत्रणेमार्फत सुरु असलेल्या प्रयत्नांना गालबोट लागते. तरी मी उपरोक्तपणे उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत वस्तुस्थिती दर्शक खुलासा करावा तसेच दैनंदिन कोरोना मयत रुग्णांची खरी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी सीमा सावळे यांनी केली आहे.