२४ तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रोजेक्ट यमुनानगर मध्ये चालू करा – नगरसेवक प्रा उत्तम केंदळे

यमुनानगर भागातील पाण्याची कामे पूर्ण झाल्याने नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून पायलट प्रोजेक्ट सुरू करावा.

    पिंपरी: चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रोजेक्ट यमुनानगरमध्ये चालू करण्यासाठी नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. केंदळे यांनी पत्रात म्हटले आहे की,”सुवेझ” या फ्रान्स येथील कंपनीमार्फत सन २०११ ला पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या पायलट प्रोजेक्टसाठी सर्वे करण्यात आला होता.यमुनानगरची जमीन पातळी उंचीवर असल्यामुळे दुस-या मजल्यावर सुद्धा पाणी चढत नाही.यमुनानगरमधील काही सोसायट्यांमधे पाणी साठविण्यासाठी टाक्यांची व्यवस्था नाही. पाणीच मिळत नसल्यामुळे तेथील नागरिकांच्या खुप तक्रारी येत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने सुवेझ कंपनीला यमुनानगरला हा प्रोजेक्ट राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सुवेझने ‘हिलेनिअम’ सिस्टीमद्वारे याठिकाणी काम करून हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी केला होता.

    कालांतराने दोन वर्षांत प्रोजेक्ट बंद करण्यात आला.शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी भामा-आसखेडचे पाणी आणण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला पाणी मिळावे यासाठी वारंवार मी सुद्धा पाणी पुरवठा विभागाशी व आयुक्ताशी पत्रव्यवहार केला आहे. माझ्या कार्यकाळात २४×७ पाणी या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये प्रभागातील जीर्ण झालेल्या पाण्याच्या लाईन,खराब झालेले पाण्याचे कनेक्शन तसेच काही ठिकाणी पाणी कंट्रोल वाल, बुस्टर लाईन या पद्धतीची ९० टक्के कामे यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, सेक्टर नंबर २२ या भागात केलेले आहेत.त्याचप्रमाणे स्कीम नंबर १,२,५,६,९ या स्किमला पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या नसल्यामुळे यांना कायमच कमी जास्त प्रमाणात पाण्याच्या प्रेशरचा सामना करावा लागत होता. यमुनानगर भागातील पाण्याची कामे पूर्ण झाल्याने नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून पायलट प्रोजेक्ट सुरू करावा.