करंदीत पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथील काही भागामध्ये नागरिकांना तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असताना आता अचानक बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला असल्याने या भागातील नागरिक, ग्रामस्थ व शेतकरी

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथील काही भागामध्ये नागरिकांना तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असताना आता अचानक बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला असल्याने या भागातील नागरिक, ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहे. करंदी (ता. शिरूर) तीन ते चार दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते, त्यांनतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करंदी येथील मुखई रोड जवळील शेतकरी सुर्यकांत दरेकर हे घराजवळ काम करत असताना त्यांना कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला त्यावेळी दरेकर यांनी येऊन पाहिले असताना बिबट्या त्यांच्या पाळीव कुत्र्याला ओढून घेऊन जात असल्याचे दिसले. यावेळी दरेकर यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील शेतामध्ये पळून गेला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुत्र्याच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाले आहे, तर करंदी सह परिसरामध्ये उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या भागामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या देखील जास्त आहे, मात्र आता या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असताना आता प्राण्यांवर हल्ले होत असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ सुद्धा भयभीत झाले असून या परिसरातील बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहे.

– ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन

करंदी (ता. शिरूर) येथील सुर्यकांत दरेकर यांच्या कुत्र्यावर सायंकाळच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना घटनेबाबत माहिती देत सतर्कतेचे आवाहन केले आहे.

– पाहणी करून योग्य कार्यवाही केली जाईल : मनोहर म्हसेकर

करंदी (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्याबाबत शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती मिळालेली असून आमच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले आहे.पाहणी केल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.