बिबट्याचे दुचाकीस्वारांवरील हल्ले सुरूच : आक्रमक बिबट्यांचा बंदोबस्त करा ; ओतूरकरांची मागणी.

ओतूर : जुन्नर तालुका हा बिबटप्रवरण क्षेत्र म्हणून मानला जात आहेच येथे बिबट्यांचे वरचेवर  दर्शन घडत असते त्यातल्या त्यात ऊसतोड सुरू झाली की हमखास बिबट्याचे दर्शन होणार हे वास्तव वारंवार अनुभवास येत आहे.

ओतूर : जुन्नर तालुका हा बिबटप्रवरण क्षेत्र म्हणून मानला जात आहेच येथे बिबट्यांचे वरचेवर  दर्शन घडत असते त्यातल्या त्यात ऊसतोड सुरू झाली की हमखास बिबट्याचे दर्शन होणार हे वास्तव वारंवार अनुभवास येत आहे. उस तोडीच्या हंगामात बिबट्यांचे दर्शन आणि हल्ले हे जणू समीकरणच तयार झाले आहे असेच म्हणावे लागेल. ओतूर वनविभागाच्या कार्य क्षेत्रात बिबट्याचा सर्रास वावर सुरू आहे.शेत वस्तीवर बिबट्या फिरताना आढळतो आहे  रात्री पण व दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने व बिबट्याचे पाळीव प्राणी आणि मानवी हल्ले थांबत नसल्यामुळे शेत वस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे.

दि.४ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास  रामदास विठ्ठल लोहकरे व मनीषा विष्णू घोडे (वय १६) हे दोघे आपले दैनंदिन शेतातील काम आटोपून  दुचाकीवरून ओतूर हद्दीतील फापाळे शिवार,ब्राम्हणवाडा रोड लागत असलेल्या कॅनॉल जवळील आपल्या रहात्या घराकडे जात असताना रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर थेट झेप घेऊन दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा घोडे या मुलीच्या पायावर पंजा मारून तिला जखमी केले ,दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकीला वेगात पुढे नेल्यामुळे हे दोघेही बालंबाल बचावले आहेत.जखमी मुलीला शासकीय रुग्णवाहिकेने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, याच फापाळे शिवार परिसरात दोन दिवसांपूर्वी याच पद्धतीने दुचाकीस्वारावर थेट झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्या घटनेत रोहोकडी येथील रवींद्र अर्जुन घोलप यास जखमी केलेले आहे.

वारंवार होणारे बिबट्याचे पाळीव प्राणी व मानवावरील हल्ले ही चिंताजनक बाब बनली असून  या भागात एकूण किती बिबटयांचा मुक्त संचार आहे हे सांगणे कठीण असले तरी विविध ठिकाणी घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटना पहाता बिबट्याची संख्या बऱ्यापैकी रोडावली असल्याचे निदर्शनास येत आहे.या परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीतपणे जीवन जगत असून  त्यांना आपल्या शेतात काम करणे देखील जिकिरीचे झाले आहे.आक्रमण करणारा बिबट्या फापाळे शिवार परिसरात ठाण मांडून बसला असल्याचे या दोन घटनांवरून स्पष्ट झाले असून अधिक काही विपरीत अप्रिय घटना घडण्याअगोदर या बिबट्याचा त्वरेने बंदोबस्त करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.