बिबट्याने पाडला चार शेळ्यांचा फडशा; दोन बोकडही ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या व दोन बोकड ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.

  वळती : येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या व दोन बोकड ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३) पहाटे घडली. या घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. वळती गावातील तागडेवस्ती येथे लहु बाबुराव लोखंडे हे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एकूण दहा शेळ्या आहेत.

  घराशेजारी असलेल्या जुन्या कौलारू घरात ते शेळ्या बांधतात. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. मध्यरात्री बिबट्याने घराच्या मागील बाजूकडून घरावर चढून कौलांमधून घरात प्रवेश केला व चार शेळ्या आणि दोन बोकडांना जागीच ठार केले. शुक्रवारी (दि. ३) सकाळी लोखंडे हे शेळ्यांना बाहेर काढण्यासाठी गेले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी वनविभागाला घटनेची खबर दिली.

  अधिकाऱ्यांकडून पंचनामा

  शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल विजय वेलकर, वनरक्षक शिवाजी दहातोंडे, वनकर्मचारी संपत भोर, शरद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

  बिबट्याचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी

  तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहेत . यापूर्वी येथून नजीक असलेल्या गाढवे वस्ती, काटवान वस्ती येथे बिबट्याने शेळ्या मेंढ्या मारल्या आहेत. या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वन विभागाला अपयश आले आहे, असा आरोप शेतकरी, नागरिकांनी केला आहे .